‘राही’ ची सुवर्णमयी कामगिरी देशाला अभिमानस्पद : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:09 PM2018-08-24T16:09:45+5:302018-08-24T16:35:14+5:30
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
कोल्हापूर : आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करणाऱ्या राही सरनोबतच्या कोल्हापूरातील राजारामपुरी येथील तिच्या राहत्या घरी सरनोबत कुटूंबियांची शुक्रवारी सकाळी भेट घेत पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राही ची नेमबाजीमधील कामगिरी कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद आहे. ही दैदिप्यमान कामगिरी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना विशेषत: शासनाच्या महसुल विभागाला प्रेरणादायी ठरणारी आहे.
कोल्हापूरला खेळाची मोठी परंपरा लाभली आहे. त्यात राही बरोबरच तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, अनुष्का पाटील, रेश्मा माने, शाहू माने, स्वरुप उन्हाळकर, आदी खेळाडूंनी करवीर नगरीसह देशाचा नावलौकीक वाढविला आहे. यापुढील काळात होणाºया पॅरा आॅलंम्पिक, युवा आॅलंम्पिक, सर्वसाधारण आॅलंम्पिक स्पर्धेत या नगरीचे १२ खेळाडू खेळणार आहेत. ते सर्व पदके जिंकून आणखी नावलौकीक वाढवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राही च्या कुटूंबातील वडील जीवन सरनोबत, आई प्रभा सरनोबत, काका राजेंद्र सरनोबत, काकी कुंदा सरनोबत, भाऊ अजिंक्य, आदित्य, वहीनी धनश्री, नातेवाईक राजेंद्र इंगळे या सर्वांचा राज्य शासनातर्फे पालकमंत्री पाटील यांनी मिठाई भरवून राज्य शासनातर्फे गौरव केला.
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासमावेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक विजय जाधव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.