‘कोल्हापूरचा राजा’ला सुवर्णालंकार
By admin | Published: September 12, 2015 12:14 AM2015-09-12T00:14:23+5:302015-09-12T00:53:04+5:30
साडेआठ लाखांचे दागिने : गोलसर्कल मित्रमंडळाचा आदर्श
कोल्हापूर : रंकाळावेश येथील गोलसर्कल मित्रमंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ गणेशमूर्तीची यंदा शाही थाटात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे साडेआठ लाख किमतीचे सुवर्णालंकार तयार करण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त व पीडितांना आर्थिक मदत, विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी शुक्रवारी दिली. मुंबई-पुण्यातील अनेक मानाच्या गणेशमूर्ती महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे आकर्षण आहेत. ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मुंबईला जात असतात. पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना राजाचे दर्शन व्हावे, या उद्देशाने गोलसर्कल मित्रमंडळ गतवर्षीपासून ‘कोल्हापूरच्या राजा’ची प्रतिष्ठापना करत आहे. गेल्यावर्षी उत्सव कालावधीमध्ये १०१ कार्यकर्त्यांनी नेत्रदान संकल्प केला आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, तसेच डिंपल कमलाकर कराळे या कर्णबधिर मुलीला वैद्यकीय मदत केली आहे. यंदा गणेशमूर्तीसाठी मुंबईतील प्रसिद्ध सुवर्णकार नाना वेदक यांच्याकडून बाजूबंद, सोनपट्टा, सोनपावले, बिगबाळी, हार, तोडे, कमरपट्टा, सोन्याची अंगठी असे साडेआठ लाख किमतीचे सुवर्णालंकार बनविण्यात आले आहेत.यंदा उत्सव कालावधीत नेत्रदान, देहदान व अवयवदान करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळ निवारण यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांतर्फे भरीव निधीची मदत केली जाणार आहे. १४ वर्षांखालील गणेश भक्तांचे रक्तगट तपासणी केली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यात काढण्यात येणार आहे. यावेळी कुणाल पाटील, उदय जाधव, सतीश नलगे, रूपेश पाटील, आशिष जोशी, अभिजित टाकसाळकर, शैलेश टांकसाळकर, शुभम पोवार, हिंमत सुतार, गौरव यादव, सुबोध जोशी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)