कोल्हापूर जिल्ह्यातील बीडमध्ये पडतो सोन्याचा पाऊस, पुनश्च प्रत्यय; शेतात सापडली सुवर्णमुद्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:59 PM2022-03-16T12:59:36+5:302022-03-16T13:00:35+5:30
कसबा बीड (ता. करवीर) गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येतोच. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत.
कसबा बीड : कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड (ता. करवीर) गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येतोच. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत.
सोमवारी (दि. १४) कसबा बीडच्या ग्रामस्थ मंगल सुनील बीडकर यांना त्रिशूळछाप सुवर्णमुद्रा मिळाली. गावातील श्री कल्लेश्वर मंदिर परिसरात शेतात भांगलन करताना हा बेडा त्यांना सापडला आहे.
स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना ‘बेडा’ असे संबोधतात. बीडकर यांना सापडलेल्या हा बेडा ६ मिमीचा असून त्यावरील अंकण अजूनही सुस्पष्ट आहे. याच्या एका बाजूवर त्रिशूळ आणि काही टिंबांचे अंकण तर दुसऱ्या बाजूवर उभवटा दिसतो.
गेल्या वर्षीही कसबा बीड गावात सोने सापडण्याचा प्रकार अनेकवेळा घडला आहे. चालू वर्षातील ही पहिलीच घटना आहे. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. गावात सापडणारे असे हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची जणू साक्ष देत आहेत.
दैवी आशीर्वाद म्हणून पुजन
कसबा बीडमध्ये आजही अशा बेड्यांना दैवी आशीर्वादाच्या स्वरूपात पुजले जाते. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करत आहे.