घरफोड्या नागरगोजेकडून सव्वा किलो सोने हस्तगत
By admin | Published: June 16, 2014 12:40 AM2014-06-16T00:40:23+5:302014-06-16T00:40:37+5:30
३२ घरफोड्यांची कबुली : अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची माहिती
कोल्हापूर : शहरात भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्या संशयित राजू प्रकाश नागरगोजे ऊर्फ राजवीर सुभाष देसाई (वय २७, रा. उचगाव गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याकडून ३२ गुन्हे उघडकीस आले असून सव्वा किलो सोने व एक किलो चांदीचे दागिने असा सुमारे ३१ लाख २७ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
सराईत गुन्हेगार राजू नागरगोजे याला जुना राजवाडा पोलिसांनी हुशारीने अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरात जुना राजवाडा, करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी, इचलकरंजी, सांगली, मिरज, कऱ्हाड, अहमदाबाद आदी ठिकाणी ३२ पेक्षा जास्त फ्लॅट फोडून सुमारे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली होती. त्याने चोरलेले दागिने गुजरीतील वशीकर ज्वेलर्स, बेळगाव येथील प्रकाश नावाच्या सराफाला विकले होते. तेथून हे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले. त्यामध्ये सव्वा किलो सोने व एक किलो चांदीचे दागिने असा सुमारे ३१ लाख २७ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये गंठण, ब्रेसलेट, रिंगा, अंगठ्या, आदी दागिन्यांचा समावेश आहे. सराफांना सोने विकण्यासाठी त्याची आई व पत्नी त्याला मदत करत असत. त्याचा साथीदार राहुल कांबळे (२९, रा. कुरुंदवाड) यालाही पोलिसांनी अटक केली. सध्या तो बिंदू चौक कारागृहात आहे तर नागरगोजे याला आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे, कॉन्स्टेबल संदीप जाधव, मोहन गवळी आदींसह गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)