गोलिवडे ग्रामपंचायतीचा कारभार धोकादायक इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:30+5:302021-03-18T04:22:30+5:30
विक्रम पाटील करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाली असून, या इमारतीमधूनच गावाचा कारभार हाकला जात ...
विक्रम पाटील
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाली असून, या इमारतीमधूनच गावाचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी प्रशासनाने निधी द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. १९८० साली बांधण्यात आलेली ग्रामपंचायत इमारत सध्या धोकादायक बनली असून, धोका पत्करून या इमारतीमधून ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. चाळीस वर्षांपूर्वी येथे चिखलमातीची कौलारू ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली होती. सध्या ही इमारत कमकुवत बनली आहे. छताचे लाकूड, सामान खराब झाल्याने छत धोकादायक बनले आहे. तर दरवाजे सडले आहेत. इमारतीच्या दोन खोलींपैकी एका खोलीत धोका पत्करून सध्या कामकाज सुरू असून, दफ्तराची कपाटे जागेअभावी अडगळीत पडून आहेत. पावसाळ्यात खराब छतातून गळणाऱ्या पाण्यामुळे इमारतीत ओलावा निर्माण होत असल्याने नागरिकांना उभा राहणेदेखील मुश्किल होऊन जाते. गावची निवडणूक पंचवीस वर्ष बिनविरोध करून गावाने एक आदर्श निर्माण केला आहे; मात्र शासनाकडे वेळोवेळी इमारतीसाठी मागणी करूनदेखील दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीचे निर्लखिकरण करून तीन वर्ष झाली; मात्र अद्यापही शासनाने इमारतीसाठी निधी मंजूर केलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
चौकट: ग्रामपंचायतीमध्ये शौचालयच नाही
शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण गावे हगणदरीमुक्त होत असताना या गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधणे बंधनकारक करून गाव हगणदरीमुक्त करण्यात आले; परंतु ग्रामपंचायतीनेच जागेअभावी शौचालय बांधले नसल्यामुळे पंचायतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
चौकट: शरद पवार यांच्या मामाचे गाव
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे गोलिवडे हे आजोळ. त्यांनी गतवर्षी गोलिवडे गावाला भेट दिली होती. यावेळी पवार यांनी शाळा इमारतीसाठी व सांस्कृतिक हाॅलसाठी दिलेल्या दोन कोटीच्या निधीतून सुरू असलेले बांधकाम पूर्णत्वास आले आहे; मात्र ग्रामपंचायत इमारतीसाठी वेळोवेळी मागणी करूनदेखील शासन स्तरावर अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत.
फोटो : गोलिवडे (ता.पन्हाळा)येथील ग्रामपंचायत इमारत धोकादायक बनली आहे.