चांगभलंऽऽऽ !
By Admin | Published: April 22, 2016 02:03 AM2016-04-22T02:03:27+5:302016-04-22T02:03:27+5:30
अपूर्व उत्साहात,रंगली चैत्र यात्रा
कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर, सजलेल्या, गगनाला भिडणाऱ्या सासनकाठ्या, खोबऱ्याचे तुकडे, गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट... लाखोंच्या संख्येने आलेल्या आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी अशा मंगलमयी वातावरणात ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा गुरुवारी मंगलमयी, भक्तिमय वातावरणात पार पडली.
देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या भाविकांची अलोट गर्दी आणि गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन निघाला.
महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वांत मोठा उत्सव. यानिमित्त गुरुवारी पहाटे देवाची काकड आरती, पाद्यपूजा झाली. पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते देवाला शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची सरदारी रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा पुजारी सचिन बुणे, सतीश मिटके, ओंकार लादे, सचिन ठाकरे, अक्षय लादे, तुषार घुगर, आदींनी बांधली. त्यानंतर देवाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.
दुपारी एक वाजता निनाम पाडळी गावची प्रथम क्रमांकाची मानाची सासनकाठी जोतिबा मंदिराच्या आवारात दाखल झाली. उत्तर दरवाजा येथे या काठीचे पूजन आमदार सतेज पाटील, आमदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी, जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे, तहसीलदार रामचंद्र चोबे, शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र खाडे, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव शुभांगी साठे, सरपंच रिया सांगळे, अजितसिंह काटकर, आदी उपस्थित होते. त्यानंतर पाटणमधील विहे गावच्या दुसऱ्या क्रमांकाच्या काठीचे पूजन झाले. पूजेनंतर सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासूनच भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. बुधवारी राज्यासह परराज्यांतील कानाकोपऱ्यांतून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या गर्दीने डोंगर परिसर फुलून गेला होता. खोबऱ्याचे तुकडे आणि गुलालाच्या उधळणीने मंदिराचा परिसर, आलेले नागरिक, भाविक गगनचुंबी सासनकाठ्यांचा भार हातांवर पेलत ढोल-ताशा, हलगीच्या कडकडाटात नृत्य करीत होते. चारीही बाजूंनी त्यांना दोरीच्या साहाय्याने आधार देणारे हात हा तोल सांभाळत होते. जोतिबा देवस्थानाच्या मानाच्या सासनकाठ्या ९८ आहेत. अन्य मानकरी असे मिळूण एकूण १०८ सासनकाठ्या आहेत. शिवाय प्रत्येक गावातील सासनकाठी वेगळी. अशा शेकडो सासनकाठ्यांची क्रमांकानुसार मिरवणूक सुरू झाली.
दरम्यान, मंदिराच्या बाहेरील परिसरात भाविक यात्रेचा आनंद लुटत होते. संध्याकाळी साडेपाचनंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
खोबऱ्याची उधळण यंदा कमीच
गेले कित्येक वर्षे चैत्री जोतिबा यात्रेत गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे खोबऱ्याचे मोठे तुकडे भाविकांना इजा करत होते. त्याची दखल घेत प्रशासनाने जोतिबा डोंगरावरील दुकानदारांना खोबऱ्याच्या अखंड वाट्या विक्रीसाठी ठेवायच्या नाहीत, असे फर्मान काढले होते. त्यामुळे खोबऱ्याच्या वाटीचे बारीक-बारीक तुकडे करून ते विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी यात्रेत खोबरे उधळण कमी झाल्याचे चित्र दिसत होते.