आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांना आले अच्छे दिन, सत्तेच्या पदावर वर्णी : मंत्रीपदावर हुलकावणी दिल्याची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:02+5:302021-07-16T04:18:02+5:30

संजय पारकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : राधानगरी-भुदरगड-आजरा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची ...

Good day to Abitkar group activists, Varni in power: Compensation for dismissal | आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांना आले अच्छे दिन, सत्तेच्या पदावर वर्णी : मंत्रीपदावर हुलकावणी दिल्याची भरपाई

आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांना आले अच्छे दिन, सत्तेच्या पदावर वर्णी : मंत्रीपदावर हुलकावणी दिल्याची भरपाई

Next

संजय पारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : राधानगरी-भुदरगड-आजरा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची विविध सत्तेच्या पदांवर निवड करण्यात यशस्वी होत आहेत. त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. गोकुळ, जिल्हा परिषद बांधकाम समिती अशा महत्त्वाच्या सत्तास्थानांसह अन्य ठिकाणी या निवडी झाल्या आहेत. आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या गटाला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली असली, तरीही जिल्हास्तरावर आमदार आबिटकर यांची ताकद वाढली आहे.

विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाल्यावर आमदार आबिटकर यांनी जनतेशी जुळलेली नाळ तुटू दिली नाही. अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न, लहान-सहान कार्यकर्त्याबरोबरही थेट संपर्क यामुळे हक्काचा माणूस अशी प्रतिमा निर्माण करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे २०१९च्या निवडणुकीत प्रतिकूल वातावरण असूनही त्यांना गुलाल मिळाला. जिल्ह्यात निवडून आलेले शिवसेनेचे ते एकमेव आमदार ठरले. यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र, काही अनपेक्षित घडामोडींमुळे या पदाने हुलकावणी दिली.

दोन महिन्यांपूर्वी आमदार आबिटकर यांची राज्य कृषी शिक्षण व परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. राजकीयदृष्ट्या याला फार महत्त्व नसले तरी या माध्यमातून चांगले काम करता येणार आहे. त्याची सुरुवातही त्यांनी बिद्रीचे माजी संचालक दत्ता उगले यांची राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक म्हणून निवड करुन केली आहे. जिल्ह्याचे आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या ‘गोकुळ’मध्ये संचालक होण्यासाठी काहीजण देव पाण्यात ठेवतात. यात काहींचे आयुष्य संपले पण हे पद काही मिळाले नाही. मात्र, पहिल्याच प्रयत्नात नंदकुमार ढेंगे व अभिजित तायशेटे या दोन खंद्या समर्थकांना ‘गोकुळ’चे संचालक करण्यात त्यांना यश आले. बिद्रीचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांची राज्य पणन महासंघाचे संचालक म्हणून निवड झाली आहे. शिवसेनेच्या सुशीला भावके यांना राधानगरी पंचायत समितीच्या सभापती म्हणून संधी मिळाली. राधानगरी तालुका संजय गांधी अनुदान निवड समितीवर अरुण जाधव यांची अध्यक्ष व काहींची सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. कृषी विभागाच्या तालुकास्तरीय आत्मा समितीवर सदस्य म्हणून अनेकजण निवडले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत वंदना जाधव यांना बांधकाम हे महत्त्वाचे आणखी एक पद मिळाले.

आता लक्ष सूतगिरणीचे...

मोठे सत्ताकेंद्र पाठीशी नसेल तर निवडणुकीत अनेक अडचणी येतात. याचा अनुभव घेतलेल्या आमदार आबिटकर यांनी राधानगरीत सहकारी सूतगिरणी उभारणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबरोबर विविध पदांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकत देऊन पुढील निवडणूक सोपी करण्याकडे त्यांचा कल असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा बँकेसाठीही प्रयत्न...

जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा बँकेत गटाचा संचालक करण्याचे पुढील उद्दिष्ट ठेवून सध्या त्यांचे काम सुरू आहे. त्यांच्या राजकारणाची सूत्र सांभाळणारे त्यांचे बंधू, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर यांना येथे संधी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Good day to Abitkar group activists, Varni in power: Compensation for dismissal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.