राधानगरीत राष्ट्रवादीला अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:03+5:302021-01-19T04:26:03+5:30
राधानगरी : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यात तळाशी, म्हासुर्ली, आणाजे व कोनोली तर्फ असंडोली या चार ...
राधानगरी : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यात तळाशी, म्हासुर्ली, आणाजे व कोनोली तर्फ असंडोली या चार ठिकाणी सत्तांतर झाले. उर्वरित तेरा ठिकाणी सत्ताधार्यांना सत्ता कायम ठेवण्यात यश आले. सतरापैकी सात ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, एका ठिकाणी काँग्रेस व नऊ ठिकाणी सर्वपक्षीय स्थानिक आघाड्यांना यश मिळाले.
बिनविरोध झालेल्या बुरंबाळी व बुजवडे येथेही स्थानिक आघाड्या होत्या.
तळाशी येथे शिवसेनेचे मारुतीराव जाधव यांची चाळीस वर्षांची सत्ता गेली. त्यांच्या आघाडीला चार जागा मिळाल्या. विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी व मित्रपक्ष आघाडीने पाच जागा जिंकल्या. म्हासुर्ली येथे सरपंच राजेंद्र सावंत यांच्यासह त्यांच्या आघाडीचा पराभव करत राष्ट्रवादीच्या संभाजी वडाम व राजेंद्र पाटील यांनी सर्व ११ जागा जिंकल्या. कोनोली तर्फ असंडोली येथे राष्ट्रवादीने सर्व जागा जिंकत सत्तांतर घडविले. आणाजे येथे शेकाप- काँग्रेसच्या मोहन पाटील, संजय तिबिले यांच्या आघाडीने सात जागा मिळवत सत्ता हस्तगत केली. दिनकर पाटील, दत्ता पाटील, एल. टी. पाटील, भिवाजी पाटील यांना फक्त दोन जागा मिळाल्या.
केवळ एका जागेसाठी निवडणूक झालेल्या पंडेवाडी येथे काँग्रेसचे सुभाष चौगले यांनी अनेक वर्षांचे वर्चस्व कायम राखले. राष्ट्रवादीच्या वाय. डी. पाटील यांनी हेळेवाडी येथे, बळवंत पाटील यांनी ऐनी येथे, शिवाजी मांजरे यांनी राजापूर येथे, सर्जेराव पाटील यांनी गवशी येथे व धनाजी पाटील यांनी कोदवडे येथे सत्ता कायम राखण्यात यश मिळवले.
‘भोगावती’चे संचालक ए. डी. पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, महादेव कोथळकर यांच्या आघाडीने गुडाळ येथे दहा जागा जिंकत सत्ता राखली. शिवाजी भिकू पाटील गटाला यावेळीही केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
..............
तरुणांचे आव्हान अयशस्वी
पनोरीत सर्वपक्षीय नेत्यांना तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले आव्हान अयशस्वी ठरले. नेत्यांच्या आघाडीला सर्व नऊ जागा मिळाल्या. कंथेवाडी येथे जनता दल-काँग्रेस आघाडीने तीन जागांसह सत्ता राखली, शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला तीन जागा मिळाल्या.
नरतवडे, खिंडी व्हरवडे, चाफोडी तर्फ ऐनघोल, सावर्दे-वडाचीवाडी येथे संमिश्र स्थानिक आघाड्यांनी यश मिळवत सत्ता कायम राखली.
.................
आणाजे येथे पती-पत्नी विजयी
नरतवडे येथे एक महिला उमेदवार केवळ एका मताने विजयी झाली. येथे नोटाला एक मत मिळाले आहे. आणाजे येथे सत्ता आली तरी, गटप्रमुख असलेले संजय तिबिले यांचा पराभव झाला. दुसरे गटप्रमुख मोहन पाटील व त्यांची पत्नी असे दोघेही विजयी झाले.