सेरी टुरिझममुळे रेशीम शेतीला चांगले दिवस --डॉ. ए. डी. जाधव -संडे स्पेशल मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:25 AM2019-06-23T01:25:10+5:302019-06-23T01:25:53+5:30
टसर रेशीम विकास कार्यक्रमासह सेरी टुरिझम ही संकल्पना राबविण्याचे आपले धोरण आहे. रेशीम शेतीतून उत्पादन वाढवून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या पुढेही महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याचे स्वप्न आहे. माझा या क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव पणाला
नसिम सनदी ।
टसर रेशीम विकास कार्यक्रमासह सेरी टुरिझम ही संकल्पना राबविण्याचे आपले धोरण आहे. रेशीम शेतीतून उत्पादन वाढवून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या पुढेही महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याचे स्वप्न आहे. माझा या क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव पणाला लावून रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
- डॉ. ए. डी. जाधव
पावसाचा लहरीपणाच्या काळातही शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. यात सुधारणेसाठी अजूनही खूप वाव असल्याने याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिल्यांदाच रेशीम सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. अतुल पाटणे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. ए. डी. जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने डॉ. ए. डी. जाधव यांच्याशी साधलेला थेट संवाद.
प्रश्न: रेशीम शेतीवरच लक्ष केंद्रित करावे असे का वाटले?
उत्तर : संलग्न व्यवसायाची जोड दिली तरच शेती परवडते. रेशीम शेती हा असा उद्योग आहे की, दर महिन्याला ताजा पैसा मिळवून देतो. तुम्ही जितके कष्ट करता, जितकी शास्त्रीय पद्धत वापरता, तितका परतावाही मिळतो. शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणावर रेशीम शेती हा चांगला पर्याय आहे. एकदा लागवड केली की ३० वर्षे उत्पादन देणारी रेशीम शेती फायदेशीर असल्यानेच याच्या प्रसारावर मी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न : या कामाची सुरुवात कुठून केली?
उत्तर : मी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर या गावचा. स्वत:ची गुंठाभरही रेशीम शेती नसताना पहिल्यापासूनच आवड असल्याने रेशीम शेती हा विषय घेऊनच पीएच.डी. केली. १९८६ पासून यात काम सुरू केले. गेली ३३ वर्षे याच क्षेत्रात कार्य सुरूआहे. जिल्हा रेशीम अधिकारी पदाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग ते गोंदिया अशा १८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत काम केले. क्युबा या देशाने मला रेशीम शेतीच्या प्रसारासाठी ब्रॅण्ड अॅम्बॅसडर म्हणून नेमले आहे.
प्रश्न : सेरी टुरिझम हा काय प्रकार आहे?
उत्तर : सेरी टुरिझम ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. अळीपासून रेशमाचा धागा कसा तयार होतो. याचे सर्वांनाच कुतूहल असते. या टुरिझमच्या माध्यमातून हे कुतूहल शमविण्याचे काम होण्याबरोबरच उत्पादकांना पर्यटकांच्या माध्यमातून नवीन उत्पन्नाचा स्रोतही तयार होणार आहे.
प्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेशीम तयार करण्याबाबतचे काय प्रयत्न सुरू आहेत?
उत्तर : थोडे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ज्ञान दिले तर रेशीम धाग्याची गुणवत्ताही राखता येते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेशीम अळी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. भारतात प्रांतनिहाय वेगवेगळे वातावरण असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या द्याव्या लागतात. शिवाय यास गेल्या वर्षापासून रोजगार हमीचीही जोड दिल्याने २ लाख ८२ हजार प्रती एकरी अनुदानही दिले जात आहे. शिवाय तयार झालेले रेशीम किमान १८० रुपये किलो दराने विकत घेण्याची हमीही शासनाने दिली आहे.
वन्य रेशीम उत्पादनावर भर
बंगळूरमध्ये मुख्यालय असलेल्या केंद्रीय रेशीम मंडळांतर्गत राज्य पातळीवर नागपूरमध्ये रेशीम संचलनालय स्थापन झाले आहे. या संचलनालयाच्या अंतर्गतच सल्लागार समिती काम करीत आहे. राज्याचे रेशीम विकासाचे धोरण ठरविण्याचे प्रमुख काम असणार आहे. या समिती अंतर्गत पहिल्याच टप्प्यात जंगल भागातील आदिवासी भागात टसर अर्थात वन्य रेशीमचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. हे रेशीम अत्युच्च पातळीचे असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे.