कोल्हापुरातील चर्चमध्ये गुड फ्रायडे : ख्रिस्ती बांधवांनी केली प्रार्थना
By संदीप आडनाईक | Published: March 29, 2024 08:01 PM2024-03-29T20:01:10+5:302024-03-29T20:01:21+5:30
सात उद्गारांवर उपदेश : येशूचे स्मरण, गीते सादर, कारागृहातील बंदीजनांसाठी प्रार्थना
कोल्हापूर: येशूचे स्मरण, स्तुतीपर गीते, प्रवचनकारांनी दिलेले उपदेश यामधून जिल्ह्यातील प्रत्येक चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचा पवित्र समजला जाणारा गुड फ्रायडे सण शुक्रवारी धार्मिक वातावरणात पार पडला. कोल्हापूरातील न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च, नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज चर्च, ब्रह्मपुरी येथील पवित्र सुवार्तिकांचे उपासना देवालय, सेवन्थ डे चर्च, ऑल सेंट्स चर्च यांसह शहर आणि जिल्ह्यातील सर्व चर्चमधून विशेष प्रवचनकारांनी उपदेश केले.
दरम्यान रविवारी महिलांकडून इस्टर संडेनिमित्त शहरात भक्तीबरोबरच ठिकठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सकाळी इंग्रजीतून आणि दुपारी मराठीतून भक्ती घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे विशेष प्रवचनकार रेव्हरंड राजीव यंगड यांनी प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात उद्गारांवर आधारित उपदेश करत ख्रिस्ताची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी असा संदेश दिला. यावेळी धर्मगुरु रेव्हरंड डी. बी. समुद्रे, सीनॉय काळे आणि अशोक गायकवाड उपस्थित होते.
या चर्चच्या आवारात भव्य मंडप आणि स्क्रीनची व्यवस्था केलेली होती. यावेळी महिला मंडळ आणि क्वायर ग्रुपकडून गुड फ्रायडेची विशेष स्तुतीपर गीतेही सादर करण्यात आली. यावेळी चर्च कमिटीचे चेअरमन विक्रम चोपडे, सचिव संदीप थोरात, कोषाध्यक्ष विनय चोपडे, आनंद म्हाळुगेकर, सुलभा जाधव, मनीषा गायकवाड, शकुंतला चोपडे, रजनीकांत चोले, उदय विजापूरकर, अभय वेंगुर्लेकर, अमित रुकडीकर, अरुण केसरकर यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.