‘सौभाग्याचं लेणं’ परत मिळालं, नागरिक भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:06 AM2019-09-11T11:06:09+5:302019-09-11T11:08:22+5:30
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे हस्ते पोलीस मुख्यालयात १६ फिर्यादी नागरिकांना सुमारे १९ लाख किमतीचे ६० तोळे दागिने परत करण्यात आले.
कोल्हापूर : ‘मुलगा डॉक्टर झाला. तो जर्मनीला प्रॅक्टिसला गेला. नोकरीचा पहिला पगार म्हणून सोन्याचे गंठण आणि गोल पेंडण दिले होते. सौभाग्याच्या लेण्यासह दागिने चोरट्याने लंपास केल्याने आम्ही हताश झालो होतो. दागिने परत मिळणारच नाहीत, अशी मानसिकता झाली होती; परंतु पोलिसांनी कसोशीने तपास करून माझं ‘सौभाग्याचं लेणं’ आणि मुलाने दिलेले दागिने परत करून मला सुखद धक्काच दिला...’ असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
राजश्री अशोक शंभुशेटे (वय ४९, रा. शाहूनगर, जयसिंगपूर) यांची ही प्रतिक्रिया ऐकून उपस्थित नागरिक गलबलून गेले. निमित्त होते महापुरादरम्यान झालेल्या घरफोडी, चोरी व चेन स्नॅचिंगमध्ये गेलेले दागिने ज्या-त्या नागरिकांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे हस्ते पोलीस मुख्यालयात १६ फिर्यादी नागरिकांना सुमारे १९ लाख किमतीचे ६० तोळे दागिने परत करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात घरफोडीचा, चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना अटक केली. तसेच महापुरात पूरग्रस्तांची घरे फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या घरफोड्या उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पूरकाळातच विशेष पथके तयार करून घरफोड्यांचा छडा लावण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि करवीर पोलिसांनी महापुरातील घरफोड्यांसह चेन स्नॅचिंगचे १६ गुन्हे उघडकीस आणले. सुमारे १९ लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
न्यायालयाच्या मंजुरीने सुमारे १६ नागरिकांचा मुद्देमाल एकत्रितरीत्या देण्यासाठी पोलीस मुख्यालयात मंगळवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रत्येक नागरिकाला त्याचे दागिने परत करीत विश्वास दिला. १० महिन्यांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पुन्हा आपल्या हाती मिळताच उपस्थित नागरिक भारावून गेले.
प्रतिमा गांधी, विमल सईबन्नावर, ज्योती परब, पल्लवी बुकशेट, शोभा कोरवी, सुजाता पाटील, सखुबाई खडके, सुरेखा मडके, सीमा शेट्टी, जयश्री बिराजदार, शोभा सुतार, अमृता मुंगळे, राजश्री शंभुशेटे, आदी महिलांच्या गळ्यातील ‘सौभाग्याचं लेणं’ हिसडा मारून लंपास केले होते. ते हातामध्ये दिसताच त्यांचा ऊर भरून आला. डोळ्यांतून अश्रू ठिबकू लागले. यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, गृह पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व कर्मचारी उपस्थित होते.
यांना मिळाले दागिने
राजश्री अशोक शंभुशेटे (४९, रा. शाहूनगर, जयसिंगपूर), प्रतिमा प्रशांत गांधी (५१, रा. माळी कॉलनी, टाकाळा), विमल भोपाल सईबन्नावार (६५, रा. माळी कॉलनी), ज्योती दीपक परब (५०, रा. मंगळवार पेठ), पल्लवी पद्माकर बुकशेट (४८, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले), शोभा सूर्यकांत कोरवी (३६, रा. गणेशनगर, ता. हातकणंगले), सुजाता राजेंद्र पाटील (५०, रा. पेठवडगाव), शहाजी राजाराम रोहिदास (४८, रा. हळदी, ता. करवीर), सखुबाई भाऊसो खडके (६२, रा. मौजे आगर, ता. शिरोळ), सुरेखा अमृत मडके (६०, रा. जयसिंगपूर), सीमा तिमाप्पा शेट्टी (६८, रा. कावळा नाका, कोल्हापूर), जयश्री इरगोंडा बिराजदार (५०, रा. यशवंतनगर, कोल्हापूर), शोभा गंगाराम सुतार (५४, रा. संभाजीनगर), अमृता अवधूत मुंगळे (४२, रा. मुक्त सैनिक वसाहत), नितीन नाना कांबळे (३५, रा. चिखली, ता. करवीर), विनोद संपत जौंदाळ (३०, रा. जौंदाळ मळा, वडणगे, ता. करवीर).