गुड न्यूज... एचआयव्हीग्रस्त मातांची बालके मात्र निगेटिव्ह टक्का वाढला : चार वर्षांत केवळ तीनच बालके पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:47 AM2021-02-28T04:47:24+5:302021-02-28T04:47:24+5:30
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पीपीटीसीटीसारखी प्रभावी उपचार पद्धती, प्रबोधन आणि वेळेत होणाऱ्या उपचारांमुळे जिल्ह्यात मातेकडून ...
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पीपीटीसीटीसारखी प्रभावी उपचार पद्धती, प्रबोधन आणि वेळेत होणाऱ्या उपचारांमुळे जिल्ह्यात मातेकडून बालकांकडे होणारे एचआयव्ही संक्रमण राेखण्यात यंत्रणेला यश आले आहे. या प्रयत्नांमुळेच गेल्या चार वर्षांत केवळ तीनच बालके पॉझिटिव्ह, तर तब्बल १९७ बालकांना एचआयव्हीपासून लांब ठेवता आले आहे.
एचआयव्हीग्रस्त महिला असेल तर तिचे बाळदेखील पॉझिटिव्ह होऊ शकते; पण अलीकडे योग्य काळजी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला तर आईकडून मुलांकडे होणारे संक्रमण रोखता येते, हे सिद्ध झाले आहे. २००२पासून जिल्ह्यात राबविलेल्या पीपीटीसीटी या उपक्रमामुळे बालकाच्या जन्मानंतर मातेप्रमाणेच बाळालाही नेविरॅपिन औषध देऊन संसर्ग ९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सुरुवात झाली. २०१४ मध्ये यात आणखी सुधारणा करीत गरोदरपणातच एचआयव्ही आहे, असे निदान झाल्यास तत्काळ मातांवरच विषाणू प्रतिबंध औषधे देऊन बाळ पॉझिटिव्ह येणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. माता, पालक यांचे समुपदेशन व उपचारासाठी सीपीआरमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष २००९ सालापासून काम करीत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या प्रयत्नांमुळे एचआयव्हीची बालकांना लागण हाेण्याचे प्रमाण ०.०४ टक्के इतके खाली आले आहे.
चौकट ०१
जिल्ह्यातील पॉझिटिव्ह गराेदर माता
वर्ष तपासणी पॉझिटिव्ह टक्का
२०१६-१७ ६८,४०२ ३१ ०.०५
२०१७-१८ ७९,५८६ ३४ ०.०४
२०१८-१९ ७०,३९३ २८ ०.०४
२०१९-२० ७८,२६३ २० ०.०३
२०२०-२१ २७,८४३ ०८ ०.०४
चौकट ०२
जिल्ह्यात ६ लाख ५६ हजार ९३८ महिलांचे एचआयव्ही तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यांपैकी ५ लाख ८७ हजार ६४३ जणींची तपासणी झाली असून, ३९७ माता या पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांपैकी चालू वर्षी आतापर्यंत ८ माता पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चौकट ०३
कोरोनामुळे एचआयव्ही टेस्ट करण्यात मर्यादा आल्या तरी आतापर्यंत २७ हजार ८४३ गरोदर मातांची तपासणी झाली आहे. त्यात आठ माता पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. २४ मातांनी बाळाला जन्म दिला. साधारणपणे बाळाच्या वयाच्या १८ महिन्यांनंतर तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळते. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून जन्माला आलेल्या बाळांची तपासणी केल्यानंतर पाच वर्षांत १९७, चालू वर्षात ३७ बालके निगेटिव्ह आली आहेत, तर केवळ ३ बालके पॉझिटिव्ह आढळली आहेत.
चौकट ०४
गरोदर महिला आणि मातांनी काय काळजी घ्यावी
एचआयव्हीग्रस्त मातांनी गरोदरपणातच योग्य तपासणी व औषधोपचार वेळेवर घेतल्यास मुलांना होणारा संसर्ग कमी होतो. गरोदर माता व तिच्या कुटुंबीयांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
एचआयव्ही योग्य उपचाराने नियंत्रणात येऊ शकतो, हे सिद्ध झाल्याने घाबरण्याचे कारण नाही. पीपीटीसीसारख्या उपचार पद्धतीमुळे मातांपासून बालकांकडे होणारे संक्रमण रोखण्यात यश येत असल्याने एड्समुक्तीच्या दिशेने चांगले पाऊल पडत आहे.
दीपा शिपूरकर
जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी