गूड न्यूज : जिल्ह्यात जूनअखेर पुरेल इतका पाणीसाठा, पाटबंधारे विभागाचे नियोजन : कोरोनाच्या संकटात पाणी टंचाईच्या झळांपासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:22+5:302021-04-08T04:25:22+5:30
कोल्हापूर : उन्हाळ्यात अगदी जूनअखेरपर्यंत वळवाचा एकही पाऊस झाला नाही तरी पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठी जिल्ह्यातील धरणांत ...
कोल्हापूर : उन्हाळ्यात अगदी जूनअखेरपर्यंत वळवाचा एकही पाऊस झाला नाही तरी पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठी जिल्ह्यातील धरणांत उपलब्ध आहे. एप्रिल ते जूनपर्यंत ८४ दिवस आहेत. त्यासाठी ५.२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज लागेल. प्रत्यक्षात धरणांमध्ये ९.५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. यादरम्यान एखादा चांगला वळीव झाल्यास दुधात साखरच पडेल.
सध्या सूर्य आग ओकत आहे. कोरोनाचा कहरही वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्या जोडीला लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता किती आहे, याची माहिती लोकमतने घेतली. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये व नंतर जानेवारीतही चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीसाठा जास्त होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असला तरी तो पुरेसा असल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी लोकमतला सांगितले. पाटबंधारे विभाग वर्षभरात सात पाळ्या करून पाणी पुरवठा करतो. यंदाच्या हंगामात त्यातील तीन पाळ्या झाल्या आहेत. अजून चार व्हायच्या आहेत; परंतु त्यापैकी शेवटची पाळी कधीच होत नाही. कारण तोपर्यंत जिल्ह्यात पावसाळा सुरू होतो. प्रत्येक पाळीस सरासरी १.५० दशलक्ष घनमीटर पाणी लागते. त्याहिशेबाने ५ ते ५.२५ दशलक्ष घनमीटर पाणी लागेल. प्रत्यक्षात ९.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय सर्वच धरणांत मृत पाणीसाठाही उपलब्ध आहे. अगदीच आणीबाणीची स्थिती उद्भवली तर त्या पाण्याचाही वापर करता येतो. जिल्ह्यात जूनपर्यंत किमान दोन तरी चांगले वळीव होतात. तसे झाले तर पाण्याच्या एका पाळीत भागते. त्यामुळे आहे हे पाणी पुरेसे होते, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने व सर्वांच्याच दृष्टीने दिलासादायक बाब आहे.
वारणा धरणात १३.६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वारणा खोरा, सांगली जिल्हा व म्हैसाळ योजनेसाठी दरमहा सरासरी चार ते साडेचार दशलक्ष घनमीटर पाणी लागते; परंतु तिथेही पुरेसा साठा उपलब्ध आहे. तुळशी खोऱ्यात उर्वरित कालावधीसाठी पाऊण दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात धरणात सध्या १.४० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे.
दशलक्ष घनमीटरमध्ये उपलब्ध पाणीसाठा : ७ एप्रिल २०२१ ची स्थिती
राधानगरी : ३.५६
तुळशी : २.२२
वारणा : १३.६५
दूधगंगा : १०.३८
कासारी : १.०२
कुंभी : १.३४
कडवी : १.३६