(गुड न्यूज) : विद्यार्थ्यांसाठी ‘गोष्टींचा शनिवार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:25+5:302021-01-01T04:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘गोष्टींचा शनिवार’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘गोष्टींचा शनिवार’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान वाढविण्याकरिता व्हॉट्सॲप आधारित सराव घेतला जाणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी हातभार लावणार आहे.
कोरोनाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ होण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्यातून विविध उपक्रम ‘डाएट’ने जिल्ह्यात राबविले. त्यामध्ये निष्ठा प्रशिक्षण, महाकरिअर पोर्टल, समावेशित शिक्षण (दिव्यांग), एक गाव एक बालरक्षक, नवोपक्रम, गोष्टींचा शनिवार, स्वाध्याय, आदींचा समावेश होता. नव्या वर्षात हे उपक्रम अधिक क्षमतेने राबविले जाणार आहेत. त्यात ‘गोष्टींचा शनिवार’मध्ये ऑनलाईन पद्धतीने दर शुक्रवारी प्रत्येक स्तरासाठी एका संकल्पनेनुसार केंद्रप्रमुखांकडून शिक्षकांना आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन गोष्ट पाठविली जाईल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची वाचन पातळी सुधारण्यास मदत होणार आहे. मराठी, सेमी इंग्रजी माध्यमांतील मराठी, गणित विषयांचे स्वाध्याय व्हॉट्सॲपव्दारे पाठविले जाणार आहेत. शिक्षकांसाठी निष्ठा प्रशिक्षण, ऑनलाईन शिक्षण परिषद कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने जिल्ह्यातील शिक्षणाला अधिक बळ देण्याचे पाऊल ‘डाएट’च्या माध्यमातून पडणार आहे.
‘डाएट’ने गेल्यावर्षी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा
‘महाकरिअर पोर्टल’चा १७,६०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
२५ समुपदेशकांमार्फत ३६ हजार विद्यार्थ्यांचे कलचाचणी अहवालानुसार समुपदेशन
ऑनलाईन शिक्षण परिषदेव्दारे २०२५ पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षकांना प्रशिक्षण
अध्यापन कौशल्य विकासाबाबत मराठी माध्यमाच्या ९००३, तर अन्य ३०८६ शिक्षकांना प्रशिक्षण
प्रतिक्रिया
विद्यार्थी, शिक्षकांसाठीच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘डाएट’ने कोरोनाच्या कालावधीतही शिक्षणाचा प्रवास अखंड सुरू ठेवला. ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम राबविला. कोरोना काळात राबविलेले सर्व उपक्रम नव्या वर्षात सुरू राहणार आहेत.
- डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट.
चौकट
शैक्षणिक मूल्यांकनासाठी ‘विद्यार्थी मित्र’
नव्या वर्षात नोव्हेंबरमध्ये तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन करणे. त्यांच्या अध्यापनातील त्रुटी, उणिवांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच हा ‘विद्यार्थी मित्र’ ॲपव्दारे विद्यार्थी, शिक्षकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.