गुड न्यूज...वडणगेच्या ‘शिवसाई’ने दिली अनेकांना शैक्षणिक दृष्टी

By राजाराम लोंढे | Published: January 1, 2023 10:04 AM2023-01-01T10:04:41+5:302023-01-01T10:05:49+5:30

गेली २५ वर्षे विद्यार्थी दत्तक योजना अखंडितपणे सुरू ठेवत शैक्षणिक उठावाचे व्रत त्यांनी जोपासले आहे.

Good news Shivsai of Vadange gave educational vision to many | गुड न्यूज...वडणगेच्या ‘शिवसाई’ने दिली अनेकांना शैक्षणिक दृष्टी

गुड न्यूज...वडणगेच्या ‘शिवसाई’ने दिली अनेकांना शैक्षणिक दृष्टी

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वच तरुण मंडळे विविध उत्सव दणक्यात साजरे करतात, मात्र उत्सवाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टी देण्याचे काम वडणगे (ता. करवीर) येथील शिवसाई कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाने केले. गेली २५ वर्षे विद्यार्थी दत्तक योजना अखंडितपणे सुरू ठेवत शैक्षणिक उठावाचे व्रत त्यांनी जोपासले आहे.

‘शिवसाई’ मंडळाची स्थापना १९९० गणेशोत्सव साजरा करण्यासाठी झाली. समाजप्रबोधनपर देखावे सादर करत असतानाच समाजातील शैक्षणिक अंधार दूर करण्याचे काम मंडळाने सुरू केले. गावातील एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मंडळाने घेतली आणि तेथून विद्यार्थी दत्तक योजनेला सुरुवात केली. तो मुलगा सध्या एका नामवंत कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे.

विद्यार्थी दत्तक घेताना मोलमजुरी करणारे, गवंडी काम, सेंट्रिंग काम, शेतमजुरी करणाऱ्या गरजू पालकांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले आहे. मंडळाचे काम पाहून समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. मंडळाने आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम केले. यावर्षी सोळा विद्यार्थी दत्तक घेतले असून हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार मंडळाचा आहे.

मंडळातील तरुण कार्यकर्त्यांची ताकद समाजोपयोगासाठी कशा प्रकारे करता येते, हेच या मंडळाने दाखवून दिले आहे. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या पुढाकारातून विद्यार्थी दत्तक योजनेचे सातत्यपूर्ण काम सुरू आहे.

‘सरोज’ कास्टिंगचे दातृत्व
गेल्या दोन वर्षांपासून सरोज कास्टिंगचे उद्योजक अजित जाधव यांनी त्यांचे वडील ज्येष्ठ उद्योजक बापूसाहेब जाधव यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी दत्तक योजनेला आर्थिक साहाय्य केले आहे.

मंडळाने जपले उपक्रमातील वैविध्य ...
शिवसाई मंडळाने गणेशोत्सवाबरोबरच अनेक उपक्रम राबविले आहेत. गौरी गीते-उखाणे स्पर्धा, आदर्श युवा शेतकरी पुरस्कार, विद्यार्थी दत्तक योजना तसेच रक्षा विसर्जनावेळी पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, ज्येष्ठ महिलांचा सत्कार, रक्तदान, सर्वरोग निदान शिबिर याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबविले आहेत.

तरुणांनी उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच समाजातील वंचित व गरजूंना ताकद देऊन उभे करण्याचे काम करावे.
प्राचार्य डॉ. महादेव नरके (शिवसाई मंडळ)

Web Title: Good news Shivsai of Vadange gave educational vision to many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.