एक रुपये पीकविमा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' तालुके आघाडीवर, ऊस पट्ट्यात प्रतिसाद कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:42 PM2023-08-08T15:42:53+5:302023-08-08T15:45:19+5:30
यंदा १५ हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार विमा कवच
कोल्हापूर : सरकारच्या वतीने यंदा एक रुपयात पीकविमा योजना आणली, त्याला जिल्ह्यातून तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला. ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला असून, ‘राधानगरी’, ‘आजरा’ व ‘चंदगड’ तालुके आघाडीवर राहिले आहेत. १५ हजार हेक्टरवरील पिकांना यंदा विमा कवच मिळणार असून, ऊस पट्ट्यात शिरोळ, कागल तालुक्यात प्रतिसाद कमी दिसत आहे.
नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत येतो. त्यातून सावरण्यासाठी सरकारच्या वतीने पीकविमा योजना गेल्या अनेक वर्षापासून राबवली जाते. मात्र, त्याचा हप्ता व जोखीम पाहता शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवत होते. यासाठी यंदाच्या खरीप हंगामापासून सरकारने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घ्यायचा आणि त्याचे लाभ पूर्वीप्रमाणेच दिले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच्या पीकविमा योजनेप्रमाणे त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
मात्र, कृषी विभागाने गावोगावी प्रबोधन केल्यानंतर शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. त्यामध्ये चार दिवसांची वाढ करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला. यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक रुपयांप्रमाणे ५५ हजार २६७ रुपये घेतले, तर राज्य सरकारने २ कोटी ६६ लाख ४९ हजार रुपयांचा हप्ता विमा कंपनीला दिला आहे.
९० टक्के अल्पभूधारक शेतकरी
पीकविम्यात ९० टक्के म्हणजेच ४९ हजार ८५४ शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. उर्वरित शेतकरी हे मोठे आहेत, यावरून लहान शेतकऱ्यांनाच विमा संरक्षणाची गरज अधिक दिसते.
तालुकानिहाय सहभागी शेतकरी व क्षेत्र हेक्टरमध्ये
तालुका - कर्जदार - बिगरकर्जदार - क्षेत्र
आजरा - १४ - ५२२४ - १३०३
गगनबावडा - ११ - २७७१ - ८१०
भुदरगड - ८० - १९५० - ४७९
चंदगड - १७१ -७२६१ - २५७६
गडहिंग्लज - १३ - ६५३५ - १९४१
हातकणंगले - १३ - ४३०३ - १५२०
कागल - ३५ - २८२५ - ९०८
करवीर - ९ - ६१०१ - १३७७
पन्हाळा - ३१ - ३८२१ - ८२१
राधानगरी - २३ - ८०८६ - १६२८
शाहूवाडी - ३३ - ३०४३ - ७६६
शिरोळ - ० - ३००४ - १३७५