कारखान्याच्या ‘भल्या’साठीच कौल
By admin | Published: March 31, 2016 12:43 AM2016-03-31T00:43:01+5:302016-03-31T00:43:16+5:30
गडहिंग्लज कारखाना निवडणूक : तगड्या सत्ताधाऱ्यांवर राहणार सक्षम विरोधकांचा अंकुश
राम मगदूम --गडहिंग्लज
आर्थिक अरिष्टात सापडलेला कारखाना कर्जमुक्त अन् शेतकऱ्यांच्या मालकीचा आम्हीच करू अशी आश्वासने देऊन सर्वच पक्ष आणि गटनेत्यांनी सभासदांचा कौल मागितला. त्यास प्रतिसाद देत संमिश्र यश देतानाच सभासदांनी नेत्यांच्या ‘ताकदी’ची जाणीवही करून दिली आहे. किंबहुना कारखान्याच्या भल्यासाठीच सत्ताधाऱ्यांबरोबरच तुल्यबळ विरोधकही दिला आहे.
पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब कुपेकर, शहापूरकर, नलवडे गटाच्या युतीचा पराभव करून तत्कालीन अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी राजकुमार हत्तरकी यांच्या साथीने विजयाची हॅट््ट्रिक केली होती. मात्र, मतभेद झाल्यामुळे दोन वर्षांतच श्रीपतराव शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव आणला. त्यानंतर चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी मुश्रीफ यांच्या सहकार्याने कारखाना ब्रीसक् कंपनीला चालवायला दिला. त्यामुळेच ही निवडणूक गाजली. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-सेनेसह शिंदे-शहापूरकर-अप्पी पाटील व स्वाभिमानीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे-शहापूरकर यांच्यात मतभेद झाल्यामुळे संभाव्य महाआघाडीतून शिंदे बाहेर पडले. जागा वाटपावरून बिनसल्यामुळे चव्हाणांनीही मुश्रीफांपासून फारकत घेतली. त्यानंतर शिंदे-मुश्रीफ-कुपेकर-नलवडे एकत्र आले तर चव्हाण यांनी शहापूरकर यांना साथ दिली. प्रारंभी ‘मुश्रीफ हटाव-ब्रीसक् हटाव’च्या मद्द्यावर साकारलेली महाआघाडी शिंदेंच्या बाहेर पडण्याने आणि विश्वासघातकीपणाचा आरोप ठेवून चव्हाण यांनी मुश्रीफ यांची साथ सोडल्यामुळेच आघाड्यांच्या बिघाड्या झाल्या. ‘स्वाभिमानी’ने एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे मुश्रीफ व ब्रीसक् हटावाचा मुद्दा बाजूला पडला आणि वैयक्ति हेवेदावे व आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होण्यासाठी गाळप क्षमता वाढ, विस्तारीकरणाचा मुद्दाच तीनही आघाड्यांनी आपला अजेंडा बनविला. त्याला दाद देतानाच प्रमुख गटनेत्यांनाच कारखान्याच्या वाटचालीस जबाबदार धरून ‘तुमचा कारभार तुम्हीच दुरुस्त करा’ या न्यायाने त्यांच्या-त्यांच्या ताकदीनुसार संचालकांना प्रतिनिधित्वाची संधी सभासदांनी मतपेटीद्वारे दिली आहे. गडहिंग्लजचे ‘दौलत’ होऊ द्यायचे नसेल तर नियतीने ही दिलेली जबाबदारी आता कुणालाही झटकता येणार नाही हाच निकालाचा अन्वयार्थ आणि बोध आहे.
‘गोडसाखर’मध्ये हसन मुश्रीफ यांचे विमान जमिनीवर : चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांचे विमान सभासदांनी जमिनीवर आणले आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याची वल्गना करणाऱ्या मुश्रीफ यांच्या वारूला सभासदांनी लगाम घातल्याबद्दल ‘गोडसाखर’चे सभासद अभिनंदनास पात्र आहेत, अशी उपरोधिक टीका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.
पत्रकात म्हटले आहे, आमच्या काही उमेदवारांचा पराभव कमी मतांत झाला आहे. शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे लढण्याऐवजी नैसर्गिक मित्रांशी आघाडी केली असती तर ‘गोडसाखर’चा निकाल वेगळा लागला असता. स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचा नैसर्गिक मित्र आहे; परंतु, या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र पॅनेल करून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. याशिवाय मुश्रीफ- शिंदे यांच्या युतीस निसटता विजय मिळवून देण्यास अप्रत्यक्षपणे हातभार लावला. सुज्ञ सभासदांनी हसन मुश्रीफ, श्रीपतराव शिंदे यांच्या संधिसाधू युतीस जवळजवळच झिडकारले आहे. स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी ‘गोडसाखर’ विकलांग करायचा डाव हाणून पाडला आहे. हा निकाल बदलत्या वाऱ्याची ही नांदी आहे.
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गडहिंग्लज कारखान्याची सत्ता मिळविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट लोकांनाच जवळ केल्यावर तुमची संगत आम्ही कशी करणार, अशी विचारणा करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी प्रसिद्धीस दिले. या कारखान्याच्या निकालानंतर पालकमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अवसानघातकीपणामुळे निकाल बदलल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यास संघटनेने प्रत्युत्तर दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, विधानसभा, महापालिका, विधानपरिषदेच्या निवडणुकीत मित्रपक्ष म्हणून आम्ही भाजपला मदत केली; परंतु ते विसरून कारखाना ज्यांनी लुटला त्यांच लोकांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलात. मग कुणी कुणाचा अवसानघात केला याचा विचार दादांनीच करावा. सहकारमंत्री या नात्याने कारवाई केली असती तर १५ भ्रष्ट चेहऱ्यांना घरी बसावे लागले असते. आम्ही स्वबळावर स्वत:चे पॅनेल उभा करू शकलो आणि किमान १२०० मतांचे मोल सभासदांनी आमच्या पदरात टाकले हा संघर्षमय जीवनाचा विजय आहे. भ्रष्ट कारखानदारीच्या विरोधात स्वाभिमानी दंड थोपटून उभीच राहिले.
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष कै. राजकुमार हत्तरकी यांच्या निधनामुळे या गटात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांचे राजकीय वारसदार चिरंजीव सदानंद हत्तरकी यांना ‘गोकुळ’मध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तालुक्यातील हत्तरकी गटात अस्वस्थता पसरली होती. मात्र ‘गोडसाखर’मधील एंट्रीने हत्तरकी गटात नवचैतन्य आले आहे.
काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून राजकुमार हत्तरकी यांनी आपला स्वतंत्र गट कायम ठेवला. गडहिंग्लजच्या पूर्व भागात आपला राजकीय प्रभाव राखून ठेवला. त्यांच्या कार्यकर्त्यांचा गोतावळा कायम राहिला. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या गटाच्या मदतीसाठी जिल्ह्यातील बडे नेते प्रयत्न करीत. दोन वर्षांपूर्वी राजकुमार हत्तरकी यांचे निधन झाले. त्यानंतर सदानंद यांच्यावर हत्तरकी गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी पडली. वीरशैव बँकेचे संचालक म्हणून संपर्क वाढविण्याचा ते प्रयत्न करीत राहिले; ‘गोकुळ’च्या सत्तारूढ आघाडीतून त्यांना संधी मिळाली. परंतु, त्यांचा पराभव झाला. काही कार्यकर्त्यांशी सदानंद यांनी जवळीक केल्याने कट्टर कार्यकर्ते दुरावले. ‘हत्तरकी गट संपला’ अशीही टीका होऊ लागली. अशावेळी सदानंद ‘गोडसाखर’मध्ये विजयी झाल्यामुळे दुरावलेले कार्यकर्तेही एकत्र येत आहेत.
जागावाटपात तीन जागा कॉँग्रेसला मिळाल्या आहेत. स्वीकृत म्हणून एकाला संधी देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिलेले आहे. आगामी पाच वर्षांत कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्यासाठीच काम केले जाईल.
- आमदार सतेज पाटील,
नेते, शेतकरी पॅनेल
सहकारी संस्थेच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होते, हे पहिल्यांदाच पाहिले. सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी संचालकांवर, पर्यायाने आमच्यावर आहे; ती प्रामाणिकपणे पार पाडू.
- आमदार हसन मुश्रीफ, नेते, शेतकरी पॅनेल
डॉ. शहापूरकर यांच्याबरोबर ऐनवेळी युती झाली. सोबतच्या सहकाऱ्यांचे समाधान करता आले नाही. बाद मतांची संख्यादेखील मोठी आहे. त्याचाही फटका बसला. सभासदांचा कौल मान्य आहे.
- प्रकाश चव्हाण, माजी उपाध्यक्ष, गडहिंग्लज कारखाना
बाद मतपत्रिकांची संख्या वाढली आहे. त्याचा फटका बसला. काही जागा थोडक्या मतांनी गेल्या. कारखाना लवकर कर्जमुक्त होऊ न स्वयंपूर्ण व शेतकऱ्यांच्या मालकीच्या राहण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहतील.
- अॅड़ श्रीपतराव शिंदे, माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कारखाना
कारखाना शंभर कोटींच्या खड्ड्यात जाऊनही सभासद अजूनही जागे झालेले दिसत नाहीत. मी संस्था, कारखाना व शेतकऱ्यांचे सुयश चिंतितो.
- डॉ. प्रकाश शहापूरकर,
माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कारखाना
स्व. आप्पासाहेब नलवडे यांनी ‘केंद्रबिंदू’ म्हणून कारखान्याची स्थापना केली. त्याला ऊर्जितावस्था आणि गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी नियतीनेच सर्वांच्यावर टाकली आहे.
- संग्रामसिंह नलवडे
प्रमुख, नलवडे गट, गडहिंग्लज