लोकांना समजून घेतल्याने चांगले काम:संजय मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:08 AM2018-08-03T00:08:07+5:302018-08-03T00:08:11+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये लोकांना समजून घेत काम केल्यामुळेच चांगले काम करु शकलो व गुन्ह्यांचेही प्रमाण रोखण्यामध्ये यश मिळाले, अशी भावना मावळते जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी व्यक्त केली.
नाशिक येथे पदोन्नतीने बदली झालेल्या मोहिते यांचा गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयात निरोपादाखल संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. नव्याने येणाºया अधिकाºयाला सर्वत्र सन्मान दिला जातो परंतु ज्यांचे चांगले काम असते, त्यांचा निरोपावेळीही सत्कार होतो हेच कोल्हापूरचे वैशिष्ट्य असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.
मोहिते म्हणाले, ‘कोल्हापूर हे जिंदादिल शहर आहे. इथला माणूस समजून घेतला की काम करण्यात अडचण येत नाही. सर्वांना सोबत घेऊनच काम करीत गेल्याने आज कोल्हापूरचा निरोप घेताना अगदी शाहू छत्रपती यांच्यापासून ते ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेकांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक चळवळीत ज्या कार्यकर्त्यांना खडसावण्याची वेळ आली, तेदेखील माझा हेतू शुद्ध होता; त्यामुळे येऊन भेटून गेले.
पोलीस दलात असलेल्या आपल्या वडिलांची कारकिर्द, त्यामुळेच कागदोपत्री आजरा येथे जन्म झाल्याची नोंद, वडिलांमुळे निळू फुले, बाबा कदम, निपाणीचे लेखक महादेव मोरे अशा अनेक साहित्यिक, कलावंतांशी आलेला संपर्क यांची दिलखुलास मांडणी मोहिते यांनी केली. यावेळी उपसरव्यवस्थापक ( वितरण, दक्षिण) संजय पाटील, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ आणि प्रशासन) संतोष साखरे, उपव्यवस्थापक (इव्हेंट) दीपक मनाठकर आदी उपस्थित होते.
इचलकरंजीत
गुन्हेगारी वाढली
इचलकरंजीत संघटित गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, त्यास अनेक कारणे आहेत. ते रोखण्यासाठी पोलिस दलाने विशेष नियोजन केले आहे. तरुण अधिकारी त्याची अंमलबजावणी करत आहेत, असेही मोहिते यांनी सूचित केले.