अलविदा २०२१ : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 'घडलं कमी.. रखडलंच जास्त'..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 12:47 PM2021-12-31T12:47:27+5:302021-12-31T12:57:20+5:30

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात काही चांगले घडले का याचा शोध घेतला असता ‘घडलं कमी आणि रखडलंच जास्त’ असेच चित्र पुढे आले.

Goodbye 2021 Some good things have happened in Kolhapur district over the last year, some questions remain | अलविदा २०२१ : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 'घडलं कमी.. रखडलंच जास्त'..

अलविदा २०२१ : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 'घडलं कमी.. रखडलंच जास्त'..

Next

कोल्हापूर : गेल्या वर्षात महापूर आणि कोरोनाने जिल्ह्याचे कंबरडे मोडले. ते मागे टाकून जिल्ह्यात गेल्या वर्षभरात काही चांगले घडले का याचा शोध घेतला असता ‘घडलं कमी आणि रखडलंच जास्त’ असेच चित्र पुढे आले.

जिल्ह्याला तीन मंत्री लाभले असले तरी शासनाकडून आटलेला निधी, प्रश्न सोडवून घेण्यात कमी होत असलेला पाठपुरावा यामुळे अनेक प्रश्न जागच्या जागीच राहिले. काही नवे तयार झाले. लोकांचे जगणे सुलभ होईल असे फार कमी घडले.

आता नव्या वर्षात तरी यातील सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील अशीच अपेक्षा नव्या वर्षाच्या सूर्याकडे करू या!

महापुराने तोडले २०१९ चे रेकॉर्ड

२०१९मध्ये कधी पाहिला नाही, ऐकला नाही असा पाऊस आणि प्रलंयकारी महापुराचा अनुभव जिल्ह्याने घेतला. या स्मृती अजून ताज्या असतानाच २०२१ मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. अवघ्या चार दिवसाच्या ढगफुटीसारख्या पावसाने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच जिल्हा महापुराच्या दाढेत ओढला गेला.

१०६४ मिलीमीटर पाऊस २२ ते २५ जुलै या काळात झाला. ४०९ गावे पाण्याखाली गेली. ७२ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. लष्कराला पाचारण करून मदत व बचावकार्य करण्यात आले. यात सहा नागरिकांनी जीव गमावला. ८१ दुधाळ जनावरे वाहून गेली. दोन हजारांवर कोंबड्या गेल्या. ९४ कोटी रुपये किमतीची पिके मातीमोल झाली. २२६ कोटींच्या शासकीय मालमत्तांचे नुकसान झाले. हजारभर कोटी रुपये नुकसान झाले. यातूनही जिल्हा वेगाने सावरला आणि पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर पुढील संकटाचा सामना करण्यासाठी ठामपणे उभा राहिला.

'नाईट लँडिंग'चे पहिले पाऊल

केंद्रीय नागरी विमान उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) कोल्हापूर विमानतळाला ‘डीएआयएफआर’ (ऑलडे) अशी परवानगी डिसेंबरमध्ये दिली. त्यामुळे नाईट लँडिंग सेवेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. नव्या वर्षात फेब्रुवारीपर्यंत नाईट लँडिंगसाठीची परवानगी मिळविण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळ हे पाच हजार मीटरच्या रेंजमध्ये होते.

त्यामुळे सूर्यास्तानंतर, ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे दृश्यता कमी झाल्यास विमान लँडिंग, टेकऑफ करण्यात अडचण येत होती. त्यामुळे विमानसेवा खंडित अथवा दृश्यता मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. डीजीसीएने ऑलडेची परवानगी दिल्याने तीन हजार मीटर रेंजमध्ये विमानतळाचा समावेश झाला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणात आणि सूर्यास्तानंतरदेखील दृश्यता मिळेपर्यंत कोल्हापुरातून विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे.

30 वर्षांनंतर 'गोकुळ'मध्ये सत्तांतर

कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) तब्बल तीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सत्ता एकतर्फी काढून घेतली.

महापालिका, विधान परिषद, विधानसभेपाठोपाठ गोकुळची सत्ताही काढून घेऊन पालकमंत्री पाटील यांनी राजकीय वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राच्या सहकार व राजकीय क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.

राही सरनोबतचे उल्लेखनीय कार्य

कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिने सरत्या वर्षात मार्च २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर जून २०२१ क्रोएशियामध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील कामगिरीवर ती जागतिक पातळीवर पहिले मानांकन मिळवणारी भारतीय नेमबाज ठरली.

त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून देशवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, स्पर्धेतील पात्रता फेऱ्यांमध्ये तिच्या पिस्टलमध्ये खराबी निर्माण झाली. त्यामुळे तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. 

ई पीक पाहणीचा फज्जा...

महसूल विभागातर्फे यंदा पहिल्यांदाच ई पीक पाहणी करण्यात आली. ही प्रणाली खातेदार शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात कळली नाही. यामुळे जिल्ह्यातील एकूण ९ लाख ९७ हजार ३१३ शेतकऱ्यांपैकी २ लाख १४ हजार १०८ खातेदारांनीच मोबाईलवरील ॲपव्दारे पीक पाहणीची माहिती भरली. उर्वरित शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसणे, तांत्रिक माहितीच्या अभावामुळे ई पीक पाहणी करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

यंदा संघर्षाविना एफआरपी

साखर कारखान्यांचा हंगाम आली की, कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष अटळ असतो. ऊस दराचे आंदोलन महिना-दीड महिना पेटत राहिल्याने जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, यंदा संघर्षाविनाच एफआरपीचा तिढा सुटला. महापुरामुळे जिल्ह्यात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

पूरबाधित ऊसाची तोडणी लवकर झाली नाही तर शेतकरी पुरता अडचणीत येणार, हे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना माहिती होते. हे सगळे गृहित धरूनच त्यांनी ऊस दराच्या आंदोलनाची दिशा निश्चित केली होती. त्यात ‘शाहू’ साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी एकरकमी एफआरपी जाहीर करुन आंदोलनाची धारच कमी केली. त्यानंतर बहुतांशी कारखान्यांनी घोषणा केल्याने यंदा संघर्षाविनाच साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला.

मेघोली फुटले, प्रश्न सोडून गेले

मेघोली धरणाच्या निमित्ताने जिल्ह्याने पहिल्यांदाच धरणफुटीच्या प्रकाराचा अनुभव घेतला. सप्टेंबरच्या १ तारखेला भुदरगड तालुक्यातील मेघोली हा ९८.६३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा, १० गावातील ५१० हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा हा डोंगराळ भागातील लघु प्रकल्प फुटला.

खडकाच्या अस्तरीकरणाचा निकष पाटबंधारेने काढून हात झटकलेे; पण यात एक महिला मृत पावली. ११ जनावरे वाहून गेली. ३०० हेक्टरवरील पिके जमिनीसह वाहून गेली. अवघ्या दोन ते तीन तासात होत्याचे नव्हते करत मेघाेली लाभक्षेत्रातील दहा गावांना आयुष्यभराच्या कटुस्मृती ठेवून गेली. अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधलेल्या या प्रकल्पाने एकूणच लघुप्रकल्पांच्या स्थळ निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

महापुराचा विळखा

कोल्हापूरला कोणताच ऋतू त्रास देणारा नसतो या पारंपरिक समजाला २०२१ च्या महापुराने तडा दिला. अवघ्या चार दिवसांच्या ढगफुटीसारख्या पावसाने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच जिल्हा महापुराच्या दाढेत ओढला गेला. १,०६४ मिलीमीटर पाऊस २२ ते २५ जुलै या काळात झाला. ४०९ गावे पाण्याखाली गेली. ७२ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. लष्कराला पाचारण करून मदत व बचावकार्य करण्यात आले. यात सहा नागरिकांनी जीव गमावला. जिल्ह्यात संपूर्ण वर्षभर पावसाळा आणि कधी कधीच उन्हाळा असेच हवामान राहिले. एका अर्थाने कोल्हापूर पावसाळाग्रस्त झाले.

महामार्ग अडकले निविदेतच

कोल्हापूरसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच दुर्लक्षित राहिलेले महामार्ग विस्तारीकरणाच्या कामासाठी हे वर्षदेखील नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने याप्रमाणेच गेले. नागपूर ते रत्नागिरी व सातारा ते कागल या महामार्ग विस्तारीकरणाचे काम एक मीटरचेही झाले नाही, नुसत्या निविदा काढण्यातच वर्ष संपले, तरी निविदा काही निघाली नाही.

आता नागपूर रत्नागिरीसाठी ११ तर सातारा कागलसाठी १८ जानेवारीला निविदा उघडल्या जाणार आहेत. निदान नव्या वर्षात तरी नारळ फुटेल, अशी आशा ठेवणे एवढेच हातात आहे. कोल्हापूर ते गारगोटी, निपाणी ते देवगड, कोल्हापूर ते गगनबावडा हे तीनही रस्ते असेच अडकले असून खड्ड्यातच वर्ष गेले.

थेट पाईप लाईन योजनेबद्दल मागितली माफी

महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खर्चाची आणि काेल्हापूरवासीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याने सरत्या वर्षातील दिवाळीची पहिली आंघोळ घालण्याचे अभिवचन मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांना दिले होते. परंतु तांत्रिक तसेच नैसर्गिक अडचणीमुळे ही योजना यावर्षीही रेंगाळली.

योजना पूर्ण होत नसल्यामुळे मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची माफी मागितली. ४८८ कोटीची योजना आहे. २०२१मधील अतिवृष्टीमुळे कामे वेळेत पूर्ण करणे ठेकेदारास अशक्य झाले. आता योजनेला ३१ मे २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

'खंडपीठ’साठी प्रतीक्षाच!

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या सहा जिल्ह्यांतील सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. प्रत्येक वर्षी लढा नेटाने सुरू असला, तरी अखेरीस वाटाण्याच्या अक्षताच हाती पडत आहेत.

२०२१ मध्ये खंडपीठ कृती समितीने नव्या दमाने पाठपुरावा करण्यासाठी विविध राजकीय नेत्यांच्या गाठी-भेटीवर भर दिला. आठवड्यापूर्वी नवी दिल्लीत केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांचीही भेट घेतली. त्यांनीही सकारात्मकता दाखवत याप्रश्नी केंद्र शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे पुन्हा ‘खंडपीठ’साठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

नाट्यगृह, खाऊगल्ली कामाची प्रतीक्षाच

ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह तसेच परिसरातील खाऊगल्ली विकसित करण्याच्या कामाला या वर्षात तत्वत: मंजुरी मिळाली. ९ कोटी ५३ लाखांचे काम असून, त्याला अद्याप प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यता मिळायची आहे. शंभर टक्के निधी राज्य सरकारने द्यावा, अशी महापालिकेची मागणी अमान्य झाली. पंचवीस टक्के रक्कम महापालिकेने घालायची आहे. कोरोना परिस्थितीमुळे पाठपुरावा करुनही या कामाला सुरुवात झाली नाही. नाट्यगृहाची अपूर्ण कामे, ब्लॅकबॉक्स, पार्किंग, खाऊगल्ली सुनियोजन अशी कामे होणार आहेत.

सेफ सिटी प्रकल्प रेंगाळला 

शहरातील सेफ सिटी प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यासाठी १२ कोटींचा निधी महानगरपालिकेने राज्य सरकारकडे मागितला आहे. यासंदर्भातील एक प्रस्ताव आठ महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठविला आहे. सुदैवाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडेच हे खाते असल्याने त्यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे. शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह ‘स्पीडगन’ वाहने घेण्याचा या प्रस्तावात समावेश आहे. पालिकेच्या प्रस्तावातील त्रुुटी, अभिप्राय यासह कागदपत्रांची पूर्तता करण्यात प्रशासनाचा वेळ जात आहे.

पंचगंगा घाट विकासाला बसला खो 

काही अतिउत्साही नागरिकांच्या विरोधामुळे पंचगंगा नदी घाट विकासाला खो बसला. विविध टप्प्यांवर केल्या जाणाऱ्या विकासकामांचा सुमारे २८ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर झाला, त्यापैकी ४ कोटी ४७ लाखांचा निधीही प्राप्त झाला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरुही झाले. नंतर केंद्रीय पुरातत्व विभागाकडे झालेल्या तक्रारींमुळे काम थांबवावे लागले. चार दीपमाळा, जुन्या पध्दतीची भिंत, एक कमान, लॅन्डस्केपिंग, विरंगुळा केंद्र, बैठक व्यवस्था, लायटिंग अशी कामे केली जाणार होती.

आरोग्य सेवा सक्षम

केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ स्पर्धेत कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाने राज्यात पहिला क्रमांक पटकावत १५ लाख रुपयांचे पारितोषिकही पटकावले आहे. जिल्ह्यातील ७ ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांना १ लाख रुपयांचे तर आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत असल्याचे हे द्योतक आहे. 

२१ वर्षांनी आंबेओहोळचा वनवास संपला

मंजुरीनंतर तब्बल २१ वर्षांनी आंबेओहोळ या लघुप्रकल्पाचा वनवास यावर्षी २०२१ सालचा मुहूर्त साधून संपला आणि आजरा, गडहिंग्लजमधील २१ गावे जलपूजनाच्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार ठरली. १९९८ मध्ये ३० कोटींचे बजेट घेऊन सुरू झालेला हा सव्वा टीएमसीचा प्रकल्प २३० कोटी रुपये खर्च करून यावर्षी पूर्ण झाला.

आजऱ्यातील १० व गडहिंग्लजमधील ११ अशा २१ गावांतील सहा हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला. बांधकामावर ८५ कोटी बांधकामावर आणि १०० कोटी रुपये पुनर्वसनावर आतापर्यंत खर्ची पडले आहेत.

वर्षभर पावसाळा, कधी कधी उन्हाळा

२०२१ हे वर्ष कोल्हापूरकरांसाठी खास ठरले. संपूर्ण वर्षभर पावसाळा आणि कधी कधीच उन्हाळा असेच हवामान राहिले. एप्रिलला वळवाच्या पावसापासून सुरुवात झालेला पावसाचा रपाटा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरूच होता. त्यानंतर कडकडीत ऊन पडलेले पाहून दुष्काळ पडतो की काय, अशी शंका व्यक्त होत असतानाच तिसऱ्या आठवड्यात महापूर येईपर्यंत पाऊस पडला.

कमी दाबाचा पट्टा, तर उद्या काय चक्रीवादळ अशी कारणे घेत पावसाने कोल्हापुरात मुक्कामच ठोकला. त्यामुळे उन्हाळ्यात कडक उन्हाळा अनुभवता आला नाही. हिवाळ्यातही दोन महिने पावसातच गेले. आता कुठे थंडी सुरू होत नाही तोवर पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला गेल्याने नेमका महिना कोणता आणि ऋतू कोणता अशी विचारणा करावी लागली.

चीनवरील बहिष्कार ‘फौंड्री’ला वरदान

कोरोनामुळे जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनवर अलिखित बहिष्कार टाकत कास्टिंग आयात करण्यासाठी भारताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील फौंड्री उद्योगाला जून २०२२ पर्यंतच्या कामाच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या ऑर्डर्समध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनवरील बहिष्कार या फौंड्रींना वरदान ठरला आहे. 

तात्या, बाबा, आण्णांची उणीव भासणार..!

आण्णांच्या जाण्याने कोल्हापूरकर हळहळले

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे २ डिसेंबरला निधन झाले. जाधव पहिल्यांदाच निवडून आले होते. त्यांची सामान्य माणसांशी चांगली नाळ जुळली होती. गोरगरिबांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्या अचानक निघून जाण्याने सारा जिल्हा हळहळला.

एक उत्तम फुटबॉलपटू म्हणून त्यांनी शालेय वयात नावलौकीक मिळवला होता. तरुणपणात त्यांनी फौंड्री उद्योगात भरारी घेत यश मिळविले होते. उद्योजकांच्या संघटना तसेच शहरातील अनेक सामाजिक कार्यात सहभागी असणारे चंद्रकांत जाधव यांचा तळागाळातील लोकांपर्यंत भेट संपर्क होता. आमदारकीची हवा डोक्यात जाऊ न देता कार्यरत असणारे सरळ व्यक्तीमत्व म्हणून ते परिचीत होते.

तात्या गेले..

कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात तात्या या नावाने परिचित असलेले टोल लढ्याचे नेते निवासराव साळोखे यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले. साळोखे यांचा मूळ पिंडच लढाऊ. महाविद्यालयीन जीवनात ते राजाराम कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी होते. फुटबॉलपटू म्हणूनही बालगोपाल तालीम संघाच्या माध्यमातून त्यांनी एक काळ गाजविला. शिवाजी विद्यापीठाच्या फुटबॉल संघाचे ते कप्तान होते.

काही वर्षे तिथे त्यांनी नोकरीही केली; परंतु नंतर ती सोडून देऊन सामाजिक काम सुरू केले. कोल्हापूरच्या टोल लढ्याचे त्यांनी नेतृत्व केले. ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील, गोविंद पानसरे, तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या बरोबरीने त्यांचे या लढ्यातील योगदान आहे. या लढ्यानंतरही कोल्हापूरच्या अनेक नागरी प्रश्नांवर ते अखेरचा श्वास घेईपर्यंत संघर्ष करीत राहिले.

विद्यापीठ सेवक संघाचे ‘बाबा’ हरपले

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर तथा बाबा आत्माराम सावंत यांचे दि. ७ नोव्हेंबरला हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने लढा देणारे अभ्यासू, शांत, संयमी, समर्पित नेतृत्वाला संघ मुकला. या सेवक संघाचे ‘बाबा’ हरपले.

विद्यापीठ ही बाबांची कर्मभूमी होती. सन १९९८ पासून सलग २३ वर्षे ते सेवक संघाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. विद्यापीठात काम करीत त्यांनी २५ वर्षे गरिबांची सेवा केली. ते दरवर्षी दोन गरीब विद्यार्थांचे पालकत्व स्वीकारत होते. अखेरच्या श्वासापर्यंत ते सेवक आणि मनोयुवा संघासाठी कार्यरत राहिले.

Web Title: Goodbye 2021 Some good things have happened in Kolhapur district over the last year, some questions remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.