दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप, ८० हून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:50 PM2019-09-04T14:50:42+5:302019-09-04T14:55:10+5:30
दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.
कोल्हापूर : दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची नांदी करीत पंचगंगा घाटावर ८० हून अधिक मूर्तींचे काहिलीत विसर्जन करण्यात आले.
प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार गणेशमूर्तींचा मुक्काम ठरलेला असतो. काही कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो, काही कुटुंबे अनंत चतुर्दशीलाच मूर्ती विसर्जित करतात; तर ९० टक्क्यांहून अधिक लोक गौरी-गणपतीचे एकाच वेळी म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी विसर्जन करतात.
तो येणार येणार म्हणून घराघरांत ज्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती, त्या लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत झाले. खीर-मोदकाचा नैवेद्य झाला. सकाळ-संध्याकाळ आरती झाली. दुसरा दिवस उजाडला, तो लाडक्या गणरायाला निरोप देणारा.
ज्या कुटुंबांमध्ये दीड दिवसाचा गणपती असतो त्यांनी अधिक काळ श्रींचे घरात वास्तव्य ठेवत सायंकाळी उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन केले. शेवटची आरती झाली आणि चिरमुऱ्यांची उधळण करीत गणेशमूर्ती घराबाहेर आणण्यात आली.
घराचा अखेरचा निरोप घेऊन नजीकच्या जलाशयाच्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन वाजल्यानंतर घाटावर मूर्ती येण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने काहिली व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पन्हागडावर प्रथमच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पन्हाळा येथील तुषार इनामदार व आशुतोष सोरटे यांनी खोकड तलावाशेजारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले.
दीड दिवसाच्या गणपतीचे प्रमाण फार कमी असल्याने येथे एक काहील ठेवण्यात आली होती. शिवाय आरतीसाठी टेबलाची सोयही करण्यात आली होती. यंदा महापूर आल्याने पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या नागरिकांना दिले जाणारे ‘सुजाण नागरिक’ हे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. रात्री आठ वाजेपर्यंत ८० हून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.