आॅनलाईन कंपन्यांचा माल जप्त
By admin | Published: April 17, 2015 11:13 PM2015-04-17T23:13:40+5:302015-04-18T00:08:26+5:30
महापालिकेची कारवाई : एलबीटीप्रकरणी कुरिअरवाल्यांना दणका
सांगली : महापालिका हद्दीत आॅनलाईन कंपन्यांच्या कुरिअरद्वारे येणाऱ्या मालावरील एलबीटी वसुलीसाठी प्रशासनाने शुक्रवारपासून कारवाई सुरू केली. सकाळी सात कुरिअर कंपन्यांकडे आलेली वाहने एलबीटी विभागाने ताब्यात घेतली, तर गांधीनगर येथून विविध व्यापाऱ्यांचा मालही जप्त केला. सलग दुसऱ्या दिवशी वाहने अडवून माल जप्तीची कारवाई प्रशासनाने केली.
शहरात कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून आॅनलाईन खरेदी केलेला माल संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचत आहे. पण त्यावरील एलबीटी वसुली होत नव्हता. अनेकदा कुरिअर व आॅनलाईन कंपन्यांना नोटिसा बजावूनही त्यांनी एलबीटी भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी एलबीटी विभागाने शहरातील कुरिअर कंपन्यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी साडे आठ वाजता एलबीटीचे पथक शहरातील विविध कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयाजवळ ठाण मांडून होते. आॅनलाईन कंपन्यांचा माल घेऊन आलेल्या गाड्या या पथकाने ताब्यात घेतल्या. ही सर्व वाहने स्टेशन चौकातील एलबीटी कार्यालयात आणण्यात आली. या कुरिअरमध्ये ई कॉम, देहलीव्हेरी, ब्लू डर्ट, तेज, मारुती, फर्स्ट फ्लाईट, डीटीसीटी या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे, तर फ्लिपकार्ड या कंपनीने एलबीटी भरला असल्याने त्यांचा माल परत करण्यात आला.
किमती मोबाईल, लॅपटॉप, इमिटेशन ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड असा किमती माल पालिकेने सील करून ताब्यात घेतला आहे. या कारवाईनंतर कुरिअर मालकांनी एलबीटी विभागात गर्दी केली होती. अनेकांनी आॅनलाईन कंपन्यांशी संपर्क साधून कारवाईची माहितीही दिली.
एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर, सहायक अमर छाचवाले, संदीप शहा, काका तांबोळी यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
(प्रतिनिधी)
चोर सोडून संन्याशाला फाशीदरम्यान, एलबीटी वसुलीत हयगय केल्याप्रकरणी या विभागाकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयुक्त कारचे यांनी नोटिसा बजाविल्या आहेत. या नोटिसीत वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात १०० टक्के एलबीटी वसूल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, असे म्हटले आहे. वस्तुत: या विभागातील अधीक्षक असो अथवा कर्मचारी, त्याला थेट एलबीटी वसुलीचे कोणतेही अधिकार नाहीत. व्यापाऱ्यावर जप्तीची कारवाई, दुकानाची तपासणी व इतर कारवाई करण्याचे अधिकार केवळ आयुक्त अथवा उपायुक्तांना आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी कधी रस्त्यावर उतरून कारवाईचे धाडस दाखविले नाही. आता मात्र एलबीटीचे उत्पन्न कमी झाल्याचा ठपका अधीक्षक व कर्मचाऱ्यांवर ठेवून हात झटकल्याची चर्चा आहेत.
आयुक्त, उपायुक्त एलबीटी कार्यालयात!
एलबीटी वसुलीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असताना, या कारवाईपासून सातत्याने दूर राहणारे आयुक्त अजिज कारचे व उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी शुक्रवारी कार्यालयाला भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. महापौर विवेक कांबळे यांनी आयुक्तांना दूरध्वनी करून कारवाईची माहिती घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर दोन्ही अधिकारी कार्यालयात आले. त्यांनी एलबीटी अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले.