शिवाजी विद्यापीठात साकारणार ‘गुगल’ची अद्ययावत प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:49 AM2018-01-01T00:49:04+5:302018-01-01T00:49:14+5:30
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बदलत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन व्यवहारांतील अनेक कामांसाठी या स्मार्टफोनवरील मोबाईल अॅपचा वापर वाढला आहे. या अॅपसह अँड्राईड प्रणालीबाबतचे नवनवीन संशोधन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात नववर्षात ‘गुगल’च्या सहकार्याने अद्ययावत प्रयोगशाळा साकारण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ आणि गुगलमध्ये जानेवारीमध्ये सहयोगी करार होणार आहे.
इंटरनेटशी निगडित सेवा, उत्पादने आणि तंत्रज्ञान पुरविणाºया ‘गुगल’ या कंपनीसमवेतच्या कराराचा मुख्य उद्देश हा संगणक शास्त्राच्या प्राध्यापकांना मोबाईल अॅप, नेव्हिगेशन, अँड्राईड प्रणाली, आदी सुविधांबाबतचे तंत्रज्ञान, संशोधनाबाबत प्रशिक्षण देणे. या प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक गुगलच्या उत्पादनांबाबत प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे असा आहे. या कराराच्या अनुषंगाने आॅक्टोबर २०१७ पासून विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. त्यात गुगलने विद्याशाखा विकास कार्यक्रमांची व्यवस्था केली आहे.
विद्यापीठातील संगणकशास्त्र अधिविभागाने प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी गुगल पुरस्कृत ‘अँड्राईड फंडामेंटल डेव्हलपमेंट’ या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा दोनवेळा घेतली आहे. त्यामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांनी शंभर प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे.
विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाने ‘मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स्’मध्ये अँड्राईड प्रणालीच्या मूलभूत घटकांबाबतचा ६० तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात विद्यापीठाच्या यावर्षीच्या दुसºया सत्रापासून झाली असून यासाठी ६० विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.
या अभ्यासक्रमासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्स्, पुस्तके असे विविध शैक्षणिक साहित्य ‘गुगल’ने उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून विद्यापीठातील संगणक शास्त्रातील डॉ. कविता ओझा काम पाहत आहेत.
करारातील पुढील टप्प्यात विद्यापीठात अँड्राईड प्रणालीबाबतच्या
नवनवीन संशोधनासाठी अद्यावत प्रयोगशाळा साकारण्यात येणार आहे. त्यासह विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागामधील १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
विद्यापीठाच्या ‘ग्लोबल भरारी’ला बळ
विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ ग्लोबल भरारी घेत आहे. त्याला ‘गुगल’समवेतच्या या सहयोगी करारामुळे आणखी बळ मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, अँड्राईड प्रणाली, मोबाईल अॅपसह संगणकशास्त्रातील संशोधनाबाबत गुगलने ग्रामीण भागातील आपल्या विद्यापीठाबरोबर काम करण्याचा देशातील पहिलाच उपक्रम आहे. विद्यापीठाने संगणकशास्त्र आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच ‘गुगल’ने या उपक्रमासाठी निवड केली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळणार आहे. संगणक शास्त्रामध्ये जगाच्या नकाशावर काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांमधील रोजगार क्षमता वाढणार आहे.
अॅप, वेब डेव्हलपर क्षेत्रात रोजगाराची संधी
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अँड्राईड प्रणालीस अनुसरून मोबाईल अॅप बनविण्याच्या क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत, असे संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘गुगल’ने भारतामध्ये तीन लाख गुगल अँड्रॉईड डेव्हलपर तयार करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. विद्यापीठासमवेत गुगलच्या होणाºया सहयोगी करारामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांतील युवक-युवतींना अॅप डेव्हलपर, वेब डेव्हलपर या क्षेत्रात रोजगाराची संधी मिळणार आहे. जानेवारीच्या दुसºया आठवड्यापर्यंत हा सहयोगी करार होईल.