गुळवे, मजुरांअभावी गुऱ्हाळघरे बंदच
By admin | Published: October 26, 2014 09:54 PM2014-10-26T21:54:50+5:302014-10-26T23:26:28+5:30
गुऱ्हाळमालक हतबल : १४५० पैकी सुमारे ६०० गुऱ्हाळघरे सुरू होण्याच्या मार्गावर
किरण मस्कर -कोतोली -यंदाच्या गूळ हंगामाला सुरुवात झाली असली तरी या हंगामासाठी गुऱ्हाळमालकांसमोर गुळव्याच्या व मजुरांच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळमालकांकडून गुळव्यांचा व मजुरांचा शोध सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गुळव्याबरोबर अन्य मजुरांच्या टंचाईमुळे यंदा जिल्ह्यामधील १४५० पैकी सुमारे ६०० गुऱ्हाळघरे सुरू होण्याची शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे. गेल्या हंगामात बाजार समितीकडे जिल्ह्यातून २५ लाख ५० हजार ३० किलो गुळाची आवक होऊन २५ ते ३० कोटींची मोठी उलाढाल झाली. यामध्ये बहुतांश गूळ गुजरात बाजारपेठेकडे गेला. पारंपरिक पद्धतीचा गूळ बनविणारे गुळवे पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडीस डोंगराळ भागात आहेत. मात्र, गुळव्यांच्या टंचाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरातील अनेक गुऱ्हाळमालक, शेतकरी गुळव्यांचा शोध घेत आहेत. दरवर्षी चार महिन्यांच्या हंगामासाठी गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजुरांची तीन ते पाच लाखांपर्यंत मजुरी द्यावी लागते. गेल्या काही वर्षांपासून काही मजुरांच्या टोळ्यांनी पैसे घेऊनदेखील कामाला न येता गुऱ्हाळमालकाला फसविल्याचे प्रकार घडले. या भीतीपोटी परजिल्ह्यांतील मजुरांना गुऱ्हाळावर आणण्याचे टाळले आहे.
अनेक गुऱ्हाळमालकांनी गुळव्यांच्या टंचाईमुळे गुळव्यांचे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे, तर स्थानिक मजुरासह घरातील काही सदस्यांना घेऊन गुऱ्हाळघर चालविण्याचा निर्णय काही गुऱ्हाळ मालकांनी घेतला आहे. दरवर्षी मजुरांची कमतरता जाणवू लागल्याने जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. १४५० गुऱ्हाळघरांसाठी सुमारे ५० ते ६० हजार मजुरांची गरज असताना अवघे २० ते २५ हजार मजूर उपलब्ध होतात. त्यामुळे मजुरांअभावी अनेक गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
गुळवे प्रशिक्षण केंद्र स्थापण्याची गरज
दरवर्षी मजूर व गुळवे यांची कमतरता भासते. त्याकडे शासनाने लक्ष देऊन अथवा कृषी संशोधन केंद्राने हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करून गुळवे तयार करण्याची गरज आहे.
बाजार समितीकडून प्रशिक्षणाचे आयोजन केले जात नाही. शासन पातळीवर कृषी महाविद्यालयांनी फक्त प्रदर्शनापुरत्या गूळ बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या, असे मत कोलोली (ता. पन्हाळा) येथील गुऱ्हाळमालक राजाराम श्रीपती जाधव, डॉ. मानसिंग सर्जेराव जाधव, बाबासो हणमंत जाधव, विकास राजाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.