गोपाळ कृष्ण गोखलेंनी रचला स्वातंत्र्य चळवळीचा पाया

By admin | Published: December 11, 2015 11:36 PM2015-12-11T23:36:53+5:302015-12-12T00:17:12+5:30

सुनील गोखले : कागलमध्ये माने महाविद्यालयात इतिहास परिषद

Gopal Krishna Gokhalee is the founder of the freedom movement | गोपाळ कृष्ण गोखलेंनी रचला स्वातंत्र्य चळवळीचा पाया

गोपाळ कृष्ण गोखलेंनी रचला स्वातंत्र्य चळवळीचा पाया

Next

कागल : स्वत: महात्मा गांधीजींनी दोन व्यक्तींना महात्मा मानले होते. त्यामध्ये महात्मा जोतिबा फुले आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा समावेश होता. लॉर्ड कर्झनने दिलेली ‘सर’ ही पदवी नाकारणारे ना. गोखले बाणेदार देशभक्त होते. वयाच्या ३९ व्या वर्षी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद गोखले यांनी भूषविले. स्वातंत्र्य चळवळीच्या अनुषंगाने म. गांधी हे कळस मानले, तर त्यांचा पाया ना. गोखले होते. असे असतानाही म. गांधींचे गुरू या पलीकडे ना. गोखले समाजाला जास्त समजलेले नाहीत. तसे प्रयत्नही झालेले नाहीत, अशी खंत ना. गोखले यांचे पणतू सुनील गोखले (पुणे) यांनी व्यक्त केली.
येथील डी. आर. माने महाविद्यालयात इतिहास विषयांतर्गत नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विषयी दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनपर भाषणात अ‍ॅड. गोखले बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे बी.सी.यू.डी.चे डॉ. डी. आर. मोरे, इतिहास विभागाचे अंकुश कदम, गोवा विद्यापीठाचे डॉ. शाम भट, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, प्राचार्य य. ना. कदम, आदी प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही. आर. देशपांडे होते.
यावेळी अ‍ॅड. सुनील गोखले म्हणाले, ३० व्या वर्षी ना. गोखले यांनी राष्ट्रीय काँग्रेससाठी पहिले संविधान लिहिले. म. गांधींपेक्षा केवळ तीन वर्षांनी ते मोठे होते. द. आफ्रिकेतील लढ्यासाठी म. गांधींना त्यांनी मदत केली. त्यांनी इंग्रजांच्या राजवटीची दहशत असणाऱ्या काळात विविध अभ्यासपूर्ण विषय मांडून काही बिले पास केली. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना त्याचा फायदा झाला. म. गांधींप्रमाणे बॅ. जिनाही त्यांचे शिष्य होते. महात्मा गांधींना संपूर्ण देश फिरण्यासाठी जी व्यवस्था केली, त्याचे श्रेय ना. गोखले यांना द्यावे लागेल.
१९०९ मध्ये गांधीजींसाठी त्यांनी पाच लाख रुपयांचा निधी संकलित केला होता. संयोजिका डॉ. आरती चौगुले यांनी स्वागत, तर प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लीला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. संतोष जेठीथोर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


गोखलेंचे कागल
अ‍ॅड. सुनील गोखले म्हणाले, आमची गोखले कुळी कोकणातील आहे. ना. गोपाळ कृष्ण गोखले कागलमध्ये शिकले. येथे काही काळ वास्तव्य केले. त्यामुळे त्यांचा वंशज म्हणून मला कागलबद्दल वेगळे आकर्षण आहे. कागलकर ‘गोखल्यांचे कागल’ असा उल्लेख करतात. तो मला सन्मान वाटतो. चर्चासत्रामुळे या संबंधांना उजाळा मिळाला आहे.


गोखलेवाद की गोडसेवाद...
काही संघटना, व्यक्ती महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करीत आहेत. ज्यांना नथुराम कळतो, त्यांना ‘हे राम’ समजत नाही, असे म्हणणे चुकीचे होईल. देशात आज ना. गोखलेंच्या विचारांची खरी गरज असल्याचे अ‍ॅड. सुनील गोखले यांनी सांगितले.

Web Title: Gopal Krishna Gokhalee is the founder of the freedom movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.