घंटागाडीवर ‘उठी उठी गोपाळा’
By admin | Published: February 5, 2015 11:44 PM2015-02-05T23:44:55+5:302015-02-06T00:43:28+5:30
मलकापूरमध्ये अभिनव उपक्रम : घोषवाक्यांतून स्वच्छतेबाबतही होणार जागृती
माणिक डोंगरे - मलकापूर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मलकापूर नेहमीच राज्यात अग्रेसर राहिले आहे़ अशाच धर्तीवर ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ औचित्य साधून मलकापूर नगरपंचायतीने घंटागाडीवर प्रभातगीते वाजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे़ कचऱ्यासाठी शहरातून फिरणाऱ्या घंटागाड्या म्हटलं की नेहमीचाच सायरनचा कर्कश आवाज आपल्या कानी पडतो़ १४ नोव्हेंबर पासून संपूर्ण देशभर ‘स्वच्छ भारत अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे शासनाकडून फर्मान काढण्यात आले आहे़ मात्र मलकापूर नगरपंचायतीने आपले वेगळेपण राखत कचऱ्यासाठी फिरणाऱ्या घंटागाडीवर ध्वनिक्षेपक बसवून त्यावर सकाळी ६ ते ११ या वेळेत प्रभात व भक्तिगीते वाजविण्याचा निर्णय घेतला आहे़ चार विभागांत पाच घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाते़ पाचही गाड्यांना ध्वनिक्षेपक बसवून सकाळी ६ ते ११ या वेळेत ‘उठी उठी गोपाळा’ यासारखी प्रभातगीते तर ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ यासारखी भक्तिगीते ऐकावयास मिळणार आहेत़ ११ ते २ या वेळेत याच ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छतेबाबतची घोषवाक्ये लावून प्रबोधन करण्यात येणार आहे़ त्यामध्ये रस्त्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छता राखा आरोग्य सांभाळा अशा घोषवाक्यांचा समावेश करण्यात आला आह़े़ दुपारी दोननंतर भक्तिगीते लावून शहरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़ पाच घंटागाड्यांसाठी विशिष्ठ प्रकारची ‘ध्वनी सर्किट’ यंत्रणा बसविण्यात आली आहे़ शहरात नवीन काहीतरी करण्याची गावकऱ्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीच अशक्य नसते़ मलकापूरच्या नागरिकांना नवीन संकल्पना आत्मसात करण्याची आवड आहे़ त्यामुळे या ठिकाणी धाडसाने नवीन उपक्रम हाती घेतले जातात़ हा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श आहे़ - राजेंद्र तेली, मुख्याधिकारी घंटागाडी म्हंटलं की तोच सायरनचा आवाज़ सायरन वाजला की आली घंटागाडी असा ग्रह व्हायचा, मात्र अनेक वेळा रूग्णवाहिका, व्हीआयपी गाड्या व अग्निशामकचा सायरन वाजला तरी आम्ही कचरा घेऊन बाहेर यायचे, मात्र आता भक्तिगीतांचा आवाज हा नक्कीच शहरातील वातावरण प्रसन्न ठेवेल़ - अनिता यादव, गृहिणी पूर्वी ग्रामीण भागात मंदिरातून सकाळी प्रभातगीते लावून गावातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न होत होता़ याच धर्तीवर शहरातील नागरिकांचे वातावरण मंगलमय ठेवण्यासाठी व नागरिकांच्या कानावर चांगले सूर पडण्यासाठी घंटागाडीतून भक्तिगीते व प्रभातगीते वाजवावीत ही संकल्पना सुचली. - मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर प्रत्येक गुरूवारी कोरडा दिवस स्वच्छ व सुंदर मलकापूर अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ डेंग्यूसारख्या साथीचे रोग टाळण्यासाठी प्रत्येक गुरूवार हा कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे़ यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची चार पथकात विभागणी करण्यात आली आहे़ ती पथके आपापल्या विभागात घरोघरी जाऊन साठवणुकीच्या पाण्याची विल्हेवाट लावून प्रबोधन करणार आहेत़