गोपालकृष्ण कामत ‘अल्टो’चे मानकरी
By admin | Published: September 9, 2015 12:17 AM2015-09-09T00:17:25+5:302015-09-09T00:17:25+5:30
‘लोकमत’तर्फे ‘वाचाल तर जिंकाल’ स्पर्धा : उजळाईवाडीच्या युवराज पाटील यांना ‘नेकलेस’ प्रदान
कोल्हापूर : ‘लोकमत’ प्रस्तुत लोकराजा राजर्षी शाहू यांच्या जीवनावर आधारित चित्रकथा स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी झाले. त्यात कळंबा (ता. करवीर) येथील गोपालकृष्ण कामत यांना ‘अल्टो कार’ हे बंपर बक्षीस, तसेच उजळाईवाडी येथील लघुवेतन कर्मचारी सोसायटीतील युवराज पाटील यांना प्रथम क्रमांकाचा सोन्याचा एक तोळ्याचा नेकलेस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.‘लोकमत’च्या शहर कार्यालयाच्या प्रवेशद्वारात झालेल्या या कार्यक्रमास ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील, बक्षिसाचे मानकरी ठरलेले युवराज पाटील यांच्या पत्नी अश्विनी तर, कामत यांची मुलगी निकीता, नातेवाईक उमेश नाईक, श्रेया व इंद्रजित नाईक, आदी उपस्थित होते. दरम्यान, ‘लोकमत’ प्रस्तुत व आर. बी. मालू ग्रुपचे ‘ओम नमो नमकिन’ आयोजित ‘लोकराजा राजर्षी शाहू’ या राजर्षी शाहू महाराज यांच्या चित्रकथेवर आधारित ‘वाचाल तर जिंकाल’ ही स्पर्धा २८ जानेवारी ते २७ एप्रिल २०१५ या दरम्यान घेण्यात आली होती. या योजनेत एकूण नव्वद कुपने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांत राजर्षी शाहू महाराजांच्या चित्रकथेवर प्रश्न विचारण्यात येऊन कुपनमध्ये प्रश्नाचे अचूक उत्तर लिहून प्रवेशिकेवर ते कुपन चिकटवायचे होते. त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या विविध उपक्रमांत मी सहभागी होतो. त्यानुसार या स्पर्धेत सहभागी झालो. स्पर्धेत बक्षीस मिळणार असे वाटत होते. मात्र, ‘अल्टो’च्या स्वरूपात बंपर बक्षीस मिळाल्याने माझे व कुटुंबीयांचे चारचाकीचे स्वप्न साकारले. स्वप्न सत्यात उतरण्याची किमया केवळ ‘लोकमत’मुळे साकार झाली.
- गोपालकृष्ण कामत
‘लोकमत’चा मी नियमित वाचक आहे. ‘वाचाल तर वाचाल’ ही स्पर्धा उत्कृष्ट होती. यातील मिळालेल्या बक्षिसापेक्षा मला राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची मोलाची माहिती मिळाली, याबद्दल मी ‘लोकमत’ला धन्यवाद देतो.
- युवराज पाटील