‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा पुन्हा सुरू; शासन भरते विम्याचा हप्ता, 'इतकी' मिळते मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:23 PM2022-12-05T16:23:13+5:302022-12-05T16:29:01+5:30

प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे कृषी विभागाने दिले आदेश

Gopinath Munde Farmer Accident Insurance Resumed, Agriculture Department Orders to Verify Proposals | ‘गोपीनाथ मुंडे’ शेतकरी अपघात विमा पुन्हा सुरू; शासन भरते विम्याचा हप्ता, 'इतकी' मिळते मदत

संग्रहीत फोटो

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्य सरकारने गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजना नव्याने सुरू केली आहे. एप्रिल २०२२ पासून ही योजना खंडित झाल्याने राज्य पातळीवर हजारो प्रस्ताव मदतीच्या प्रतीक्षेत होते. या प्रस्तावांची तत्काळ पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब अडचणीत येते. यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात योजना सहा वर्षांपूर्वी सुरू केली होती. विम्याचा हप्ता शासन भरते. या योजनेनुसार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्याचबरोबर एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.

विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, हिस्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

काय आहेत निकष

मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सात/बारा उतारा बंधनकारक
शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील असावा.

कोठे संपर्क साधावा

शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजीकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.

जिल्ह्यात ११५ प्रस्ताव पडून

एप्रिल ते ऑगस्ट २०२२ अखेर योजना खंडित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ११५ प्रस्ताव कृषी विभागाकडे आहेत. त्याची पडताळणी करून त्यांना लाभ देण्यात येणार आहे

Web Title: Gopinath Munde Farmer Accident Insurance Resumed, Agriculture Department Orders to Verify Proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.