कोल्हापूर जिल्ह्यात ४८८ गावात झाली गावठाण वाढ, मात्र यावर्षात एकही प्रस्ताव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:48 PM2017-12-09T14:48:20+5:302017-12-09T14:58:43+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४८८ गावात गावठाण विस्तार झाला आहे. यामध्ये १९८९ ते १९९९ या दशवार्षिक योजनेत ४८८ तर त्यानंतर अलिकडे २०१६ मध्ये कुरुकली व नरंदे या गावात गावठाण विस्तार झाला आहे. गावठाण विस्तार योजनेचे काम सुरु असले तरी यावर्षात एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला नाही.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४८८ गावात गावठाण विस्तार झाला आहे. यामध्ये १९८९ ते १९९९ या दशवार्षिक योजनेत ४८८ तर त्यानंतर अलिकडे २०१६ मध्ये कुरुकली व नरंदे या गावात गावठाण विस्तार झाला आहे. गावठाण विस्तार योजनेचे काम सुरु असले तरी यावर्षात एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला नाही.
एखाद्या गावात गावठाण योजना राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आल्यास निकषांमध्ये ते बसतात का ते पाहून ते प्रस्ताव मंजूर केले जातात. या मंजूरीनंतर गावात उपलब्ध असलेली शासकिय जमिन किंवा गायरान यासाठी देण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यात १९८९ ते १९९९ या काळात ‘तृतीय दशवार्षिक गावठाण विस्तार योजना’ राबविण्यात आली.
१९८९ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या कारकिर्दीत या योजनेला सुरुवात झाली. या दहा वर्षात ४८६ गावात गावठाण विस्तार झाला. यामध्ये सर्वाधिक राधानगरी तालुक्यात ८१ गावांमध्ये तर त्या खालोखाल चंदगड व कागल तालुक्यात प्रत्येकी ५४, शाहुवाडीत ४८, शिरोळमध्ये ४६, गडहिंग्लजमध्ये ४३, भुदरगडमध्ये ३९, करवीरमध्ये ३०, पन्हाळ्यात २७, हातकणंगलेमध्ये २८, आजऱ्यामध्ये २९, गगनबावड्यात ९ गावांमध्ये गावठाण विस्तार झाला आहे.
जिल्ह्यात १९९९ नंतर अलिकडच्या काळात म्हणजे २०१६ मध्ये करवीर तालुक्यातील कुरुकली व हातकणंगले तालुक्याती नरंदे येथे गावठाण विस्तार योजना झाली आहे. गावठाण विस्तार योजना सुरु असली तरी या वर्षात जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भातील एकही प्रस्ताव आलेला नाही.
गावठाणसाठी निकष व अटी
- गावाची गावठाणवाढ यापूर्वी झाली आहे का?
- गावठाणात प्लॉट वाटपासाठी शिल्लक पाहीजेत
- गावठाणासाठी आवश्यकता असल्यास कारणासहित सविस्तर खुलासा करावा
- गावठाणासाठी आवश्यक असणारी गायरान किंवा सरकार हक्कातील जमिनीचा उतारा जोडला पाहीजे
- जमिन अतिक्रमण विरहित असावी
- गायरानातील लागवडलायक क्षेत्राच्या ५ टक्के क्षेत्र शिल्लक असावे
- गावठाण वसाहतीस योग्य असल्याबाबत तहसिलदारांचा पाहणी अहवाल
- गावठाण वसाहतीस योग्य असल्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांचा दाखला
- सुचविण्यात आलेली जागा नागरि सुविधा पुरविण्यासाठी योग्य असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला
- गावठाणवाढीसाठी ग्रामपंचायतचा ठराव
- गावठाणामधील भूखंडासाठी घर नसणाऱ्यांना प्राधान्य असेल
- पात्र व गरजू लाभार्थ्याला मिळालेल्या भूखंडावर एक वर्षाच्या आत बांधकाम सुरु करावे लागणार आहे.
- पात्र लाभार्थी गावचा रहिवासी असावा
गावठाणासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून याबाबतचा ठराव करुन निकषांसह कागदपत्रांची पुर्तता असलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यास त्याला मंजुरी देण्यात येईल. या वर्षात एकही प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. गतवर्षी नरंदे व कुरुकली येथील गावठाण वाढीच्या प्रस्तावांना मंजूरी दिली आहे.
-नंदकुमार काटकर,
अप्पर जिल्हाधिकारी