पॉश प्रभागाला ग्राऊंडचे ग्रहण
By admin | Published: December 30, 2014 11:45 PM2014-12-30T23:45:22+5:302014-12-31T00:11:29+5:30
महापालिकेची शाळा दुरवस्थेत : सासने ग्राऊंडची अस्वच्छता; सार्वजनिक स्वच्छतागृहाभोवती कचऱ्याचे ढीग
कोल्हापुरातील ‘उच्चभू्र नागरिकांचा प्रभाग’ म्हणून ओळख असलेला ताराबाई पार्क या चकचकीत प्रभागाला सासने ग्राऊंडच्या अस्वच्छतेचे लागलेले ग्रहण काही सुटत नाही. या भागात बऱ्यापैकी विकासकामे झाली असली तर महापालिकेच्या सासने शाळेची अवस्था म्हणजे अस्वच्छतेच्या विळख्यात विद्येचे मंदिर अशी ओळख सांगावी लागेल. मात्र, शहरातील अन्य प्रभागांच्या मानाने या प्रभागात बऱ्यापैकी निधी खर्च झाला आहे.
ताराबाई पार्क या प्रभागात सासने ग्राऊंडसमोरील मेनरोड, पूर्ण ताराबाई पार्क, पर्ल हॉटेलकडे जाणारा रस्ता, घरकुल, बैलगोठा, आदित्य कॉर्नर, किरण बंगलो या परिसराचा समावेश आहे. माजी नगरसेवक नीलेश देसाई यांनी या भागात विकासकामे केल्यानंतर त्यांच्या पत्नी पल्लवी देसाई या आता प्रभागाच्या नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. त्रिकोणी आकारातल्या या प्रभागात ५ हजार ७०० लोकसंख्या असून, हा भाग शहरातील श्रीमंतांचा आणि उच्च मध्यमवर्गीयांचा ओळखला जात असल्याने इथे ड्रेनेजलाईन किंवा गल्ली-बोळातील कचराकुंडी, पाण्याची गैरसोय अशा समस्या नाहीत. मेनरोड खूपच खराब असल्याने त्याबद्दल नागरिकांची तक्रार होती, मात्र आता या रस्त्याचेही काम सुरू झाले आहे. शिवाय भागातील बऱ्यापैकी रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे.
या भागात सर्वांत मोठी समस्या आहे ती सासने ग्राऊंडच्या अस्वच्छतेची. है मैदान महापालिकेच्यावतीने विविध प्रदर्शनासाठी व कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाते. एकदा कार्यक्रम झाला की ग्राऊंडमधील अस्वच्छता न पाहण्यासारखी असते.
सार्वजनिक स्वच्छतागृह, त्याभोवती कचऱ्याचे ढीग, समोरच्या बाजूला मोठी कचराकुंडी, चॅनेलचे काम झाले असले तरी वाहणारा नाला हे दृश्य म्हणजे ताराबाई पार्कच्या सौंदर्याला लागलेली दृष्ट असेच म्हणावे लागेल. याच आवारात महापालिकेची सासने शाळा आहे. बालवाडी ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेची पटसंख्या आहे ८०. पण ही शाळा तुंबलेले गटार, प्रचंड अस्वच्छता, जागोजागी कचऱ्याचे ढीग, भंगार झालेली वाहने या सगळ््या चक्रव्युहात अडकली आहे. शाळेच्यावतीने याबाबतची तक्रारही देण्यात आली आहे. महापालिकेच्या पातळीवर याबाबत कार्यवाही होत नसल्याचे देसाई यांनी सांगितले.
प्रभागासाठी गेल्या पाच वर्षांत जवळपास दोन कोटींची कामे मंजूर झाली आहेत. यापैकी १ कोटी ८० लाखांची विकासकामे झाली आहे. आम्हाला प्रश्न आहे तो फक्त सासने ग्राऊंडच्या अस्वच्छतेचा. आचरेकर बंगला येथील एक रस्ता होणे बाकी आहे. एवढा प्रश्न सोडला तर प्रभागाचा विकास झाला आहे.
- पल्लवी देसाई (नगरसेविका)
इंदुमती गणेश
प्र. क्र. १0
(ताराबाई पार्क)
प्रतिबिंब प्रभागाचे