Kolhapur- विशाळगड घटनेला सरकार, प्रशासन जबाबदार; संभाजीराजे यांचा आरोप video
By भारत चव्हाण | Published: July 15, 2024 04:21 PM2024-07-15T16:21:22+5:302024-07-15T16:24:55+5:30
'अतिरेक्याचे गडावर वास्तव्य, त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? पालकमंत्री मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये'
कोल्हापूर : विशाळगडावर रविवारी जी घटना घडली त्याला सरकार, जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करतानाच मी गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमण काढा म्हणून मागे लागला होतो, त्याची दखल घेतली नाही. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अतिक्रमण काढण्याचे आदेश देत आहेत. मग यापूर्वी ते काढण्यावर कोणाचा दबाव होता? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्या पुरोगामीत्वावर संशय घेतला. त्यांनी मला पुरोगामीत्व शिकविण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात संभाजीराजे यांनी मुश्रीफ यांना फटकारले आहे. पालकमंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. माझ्या पुरोगामीत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. माझा जन्मच छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यात झाला आहे. मुश्रीफांनी त्यांच्या पोरानं पैशाचं काय केले, कारवाईला घाबरुन पक्ष बदललले यावर बोलावे, असे संभाजीराजे म्हणाले.
विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय सरकारने गांभीर्याने घेतला नाही. शिवभक्त मोठ्या संख्येने येणार आहेत हे माहित असतानाही जिल्हा प्रशासनाने यंत्रणाला का लावली नाही. तुम्ही अतिक्रमण का काढले नाही. मला त्या ठिकाणी का पोहचू दिले असे सवाल करत संभाजीराजे यांनी जिल्हा प्रशासनालाही झोडपले.
अतिरेक्याचे गडावर वास्तव्य
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी यासीन भटकळ विशाळगडावर येऊन वास्तव्य केले, त्याच्या नोंदी आहेत. त्यावेळी पालकमंत्री महाशय कोठे होते? त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. विशाळगडावरील अतिक्रमणाला कोणाचा पाठिंबा होता, प्रशासनावर कोणाचा दबाव होता हे लपून राहिलेले नाही. म्हणून काल जी दंगल घडली त्याच्या खोलात निश्चितपणे जावे, असेही ते म्हणाले.
आंदोलनात उशिरा उतरलो याची खंत
विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत मला उशीरा कळले. आंदोलनात उशीरा उतरलो. सहा वर्ष खासदार होतो, पण त्यावेळी मी तिकडे गेलो नाही याची मला खंत वाटते, असे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजेंची हतबलता
सर्वच सरकारांवर संभाजीराजे यांनी हल्लाबोल केला असून त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. गडकोट किल्ल्यांना ४५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र काही घडले नाही. सर्वच गडावरील अतिक्रमणाला आतापर्यंत आलेली सरकारे जबाबदार आहेत. रायगडावरील विकास कामात एक टक्का कमिशन खाऊ दिले नाही. प्रामाणिकपणे काम करत आहे. गडकोट किल्ल्यांसाठी मी लढतो हे नको असेल तर मला सांगा. मी थांबतो. मला सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ लागला आहे. गडकोटांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातून मी त्रासून गेलो आहे. अशा उद्वीग्न भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
त्याचा शोध घेईन
माझ्या खांद्यावर कोणी बंदूक ठेऊन घटना घडवून आणत असेल तर त्याचा नक्की विचार करीन, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन, सरकारच्या उदासिन भूमिकेनंतर घडलेल्या घटनेवर शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले जाणार असतील तर पहिला माझ्यावर गुन्हा नोंदवा, असे आव्हानही त्यांनी दिले.