मंडलधिकारी यांनी लोकवर्गणीतून उभारल्या सरकारी इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:59+5:302021-06-25T04:17:59+5:30
लोकमत न्युज नेटवर्क बाजारभोगाव : सरकारी अधिकारी व नागरिकांनी मनावर घेतले तर किती सकारात्मक बदल घडू ...
लोकमत न्युज नेटवर्क
बाजारभोगाव : सरकारी अधिकारी व नागरिकांनी मनावर घेतले तर किती सकारात्मक बदल घडू शकतो हे बाजारभोगाव व काटेभोगाव मंडलधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी लोकसहभागातून महसूलची सुसज्ज कार्यालये उभारून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मंडलाधिकारी बी. एस. खोत यांच्यासह महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व मदत करणाऱ्या नागरिकांचे जनतेतून कौतुक होत आहे.
बाजारभोगाव मंडलाधिकारी कार्यालयाअंतर्गत सहा तलाठी सजा आहेत. बाजारभोगाव बाजारपेठेत तलाठी व मंडलधिकारी यांचेसाठी चावडीची जुनी व लहान इमारत होती. बाजारभोगाव परिसरातील तीस ते पस्तीस वाड्या वस्त्यांवरील लोकांचा येथे कामानिमित्त नेहमीच संपर्क यायचा. त्यामुळे लोकांना दाटीवाटीने बसायला लागायचे. जागा अपुरी असल्याने लोकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असे. चावडी बांधण्यासाठी निधी मिळावा यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी शासन दरबारी अनेकवेळा प्रस्ताव पाठवले. परंतु निधी नसल्याने गेली अनेक वर्षे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
छोट्या इमारतीमुळे लोकांसह कर्मचाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेऊन मंडलधिकारी अधिकारी बी. एस. खोत यांनी सुसज्ज इमारत बांधण्याचा निश्चय केला. बघता बघता दोन ते अडीच महिन्यांत तब्बल साडेनऊ लाखांच्या बाजारभोगाव व काटेभोगाव येथे सुसज्ज दोन इमारती उभारण्यात आल्या. कर्तव्यदक्ष तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडलधिकारी बी. एस. खोत यांच्या नेतृत्वाखाली तलाठी प्रज्योत निर्मळे, एकनाथ गंभीरे, शरद पाटील, विशाल सरवटे, वीणा कांबळे, प्रियांका महाजन तसेच कोतवाल यशवंत गुरव, संभाजी कुंभार, बंडा गुरव, लहू पाडेकर , रघुनाथ खांटागळेकर, बापू पोवार व सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावत [ किसरुळ ] यांनी लोकसहभागातून जुन्या इमारतीचा कायापालट व स्वतंत्र सुसज्ज सरकारी कार्यालये बनवून जनतेची गैरसोय दूर केली. गेले तीन चार महिने त्यांनी स्वतःला झोकून देवून काम केले. लोकांना मदत करणेचे आवाहन केले. लोकांशी चांगला संवाद व संबंध ठेवल्यामुळे महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सरकारी निधीची वाट न पाहता मोठ्या धीराने , इच्छाशक्तीच्या जोरावर मंडलाधिकारी बी. एस. खोत व त्यांच्या टीमने केलेले लोकोपयोगी काम नक्कीच कौतुकास्पद आहे. २४ बाजारभोगाव तलाठी कार्यालय
फोटो ओळ
बाजारभोगाव येथे लोकवर्गणीतून साकारलेली महसूलची सुसज्ज इमारत.