पूरग्रस्तांना मदत देण्यास शासन बांधिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:08+5:302021-09-06T04:29:08+5:30
पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील अतिवृष्टी बाधितांना २०१९ प्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय ...
पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील अतिवृष्टी बाधितांना २०१९ प्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ ऑगस्टला जाहीर केला आहे. परंतु, राज्यात अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ठिकाणच्या नुकसानीचे सखोल पंचनामे होऊन सर्व नुकसानग्रस्तांना लाभ होण्यासाठी शासन निर्णय होणे अभिप्रेत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे सांगितले.
ते म्हणाले की, यंदा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शहरी भागातील नागरिकांनाही नुकसानीला तोंड द्यावे लागले. या सर्वांना नुकसानभरपाई देऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसानंतर झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. कोणी नुकसानभरपाई पासून वंचित राहू नये अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये राज्यात पुन्हा काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यांचेसुद्धा पंचनामे होऊन मदत मिळणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार होऊन योग्य शासन निर्णय काढण्यासाठी आघाडी सरकारचे प्रयत्न आहेत
कोट :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात आज सोमवारी चर्चा होत आहे, अजून काही उणिवा, अडचणी असतील त्याचे निरसन या बैठकीत निश्चितपणे केले जाईल. महाविकासआघाडी सरकार म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका राहील.
सतेज पाटील
पालकमंत्री कोल्हापूर.