गरिबांना चिरडणाऱ्या सरकारचे दिवस भरले
By admin | Published: June 20, 2016 12:47 AM2016-06-20T00:47:02+5:302016-06-20T00:50:37+5:30
हसन मुश्रीफ : राष्ट्रवादीची बैठक; पंधरा वर्षांची सत्तेची मस्ती जिरल्याने चांगले काम करून दाखवू
कोल्हापूर : गोरगरिबांच्या योजना बंद करून त्यांना चिरडणारे, शेतकऱ्यांना गाडणारे व पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करून विदर्भाला भरभरून देणाऱ्या राज्यातील महायुतीच्या सरकारचे दिवस भरल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. पंधरा वर्षे सत्तेत राहिल्याने आम्हाला काहीशी मस्ती आली होती; पण आता ती जिरली असून येथून पुढे आदर्श काम करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. राज्य सरकारमधील ‘बिन बुलाये मेहमान’ अशी शिवसेनेची खिल्ली उडवत आमदार मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षात सरकारने सामान्य माणसांना संपविले आहे. प्रत्येक मंत्री भ्रष्टाचाराने बरबटला आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात किती पैसा नेला, याचा भांडाफोड आगामी अधिवेशनात करणार आहे. गरिबांना चिरडणाऱ्या सरकार फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा आहे. दहा वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता होती; पण काही चुकांमुळे गेली. आता एकसंधपणे बांधणी करून पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची शपथ घ्या, असे आवाहन करीत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, २५ व २६ जून रोजी शरद पवार दौऱ्यावर येत आहेत, त्यांचे स्वागत जंगी करायचे असून प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आणावे.
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊन पक्षमजबुतीसाठी प्रयत्न करणार आहे. मुश्रीफसाहेब, तुम्ही चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून तिथे तुमच्या विचारांचा अध्यक्ष बसविण्याचा विडा आम्ही उचलला आहे. संगीता खाडे, महादेव पाटील, डी. बी. पिस्टे, अवधूत अपराध, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, नामदेवराव भोईटे, आर. के. पोवार, नंदिनी बाभूळकर, भैया माने, धैर्यशील पाटील, अमोल माने, अरुण इंगवले, मुरलीधर जाधव, मधुकर जांभळे, बाबूराव हजारे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दादा, सूज उतरली की कळेल
भाजपने अलीकडे कागल व गडहिंग्लजमध्ये मेळावे घेतले. यामधील गर्दी पाहून ‘मुश्रीफ यांनी मेळावा पाहिला तर त्यांना धडकी भरेल’ असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांनी केले. आपणाला दादांवर बोलायचे नव्हते; पण ते माझी कळ काढतात, म्हणून बोलावे लागते. ‘दादा, मेळाव्यातील गर्दी ही सत्तेची सूज आहे. ती उतरली की कळेल,’ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.