सरकारचे दिवस भरले- ‘एन. डी.’ कडाडले

By admin | Published: July 26, 2014 12:02 AM2014-07-26T00:02:17+5:302014-07-26T00:16:52+5:30

‘तासगाव’ कारखाना हस्तांतराबाबत कामगार आक्रमक; राज्य बँकेच्या दारात ठिय्या

Government Days Filled - N. D. 'Kadadale | सरकारचे दिवस भरले- ‘एन. डी.’ कडाडले

सरकारचे दिवस भरले- ‘एन. डी.’ कडाडले

Next

कोल्हापूर : तासगाव व पलूस तालुक्यातील २७ हजार शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा विषय असलेल्या तासगांव साखर कारखान्याचे हस्तांतरण अवसायक मंडळाकडे करावे. या मागणीसाठी आज, शुक्रवारी कारखान्याचे कामगार व शेतकऱ्यांनी राज्य बँकेच्या कोल्हापूर शाखेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी बी. डब्ल्यू. बकाल यांना धारेवर धरत, एकाने आदेश द्यायचे आणि दुसऱ्याने पाळायचे नाहीत. या पद्धतीने जर कोणी शेतकऱ्यांची चेष्टा करत असेल तर त्याची किंमत मोजावी लागेल. आता शंभर अपराध झाल्याने सरकारचे दिवस भरल्याचा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी यावेळी दिला.
कामगार व शेतकरी सकाळी अकरापासून बँकेच्या स्टेशन रोडवरील शाखेच्या दारात ठिय्या मारून होते. आठ-दहा जणांच्या शिष्टमंडळाने बँकेचे शाखाधिकारी तथा कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी बकाल यांच्याशी चर्चा केली. श्रीकांत लाड म्हणाले, भाड्यातून वर्षाला दहा कोटी रुपये येत असताना राज्य बँकेने खासदार संजयकाका पाटील यांच्याशी संगनमत करून ३२ कोटींसाठी कारखाना विक्रीस काढून तो १४ कोटीला घशात घातला. या पापाचे वाटेकरी बँक आहे. विक्री रद्द करून अवसायक मंडळाच्या ताब्यात कारखाना देण्याचे आदेश शासनाने दिले असताना, अद्याप का दिला नाही. कारखाना ताब्यात घेताना ज्या मशिनरी होत्या, तशा मार्च २०१४ पर्यंत परत करण्याचे प्रतिज्ञापत्र गणपती संघाने न्यायालयात दिले. त्याचे काय झाले. ज्यांनी आमचे संसार उद्ध्वस्त केले त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा लाड यांनी दिला.
कारखान्याबाबत बँकेकडून शासनपातळीवर चर्चा सुरू आहे. हस्तांतराबाबत काही कायदेशीर बाबींचा अडथळा येत असल्याने ११ मुद्द्यांचे निरसन करण्याची मागणी बँकेने शासनाकडे केली आहे. यापैकी एकाच मुद्द्याचे निरसन झाल्याने बँकेने पुन्हा शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. गणपती संघावरही बँकेने कारवाई केली आहे. त्यांच्या मालकीच्या मशिनरी वेळेत न उचलल्याने त्यांचा हक्क संपुष्टात आल्याचे बकाल यांनी सांगितले. यामध्ये हस्तक्षेप करत संघाकडे ताबा देताना असलेल्या मशिनरी व आताची याची खातरजमा केली आहे काय? कोणत्या ११ मुद्द्यांचे निरसन गरजेचे आहे, अशी विचारणा आर. डी. पाटील यांनी केली. याचिका कोणाच्या आहेत, कारखाना वाचवा अशी याचिका शेतकऱ्यांच्या आहेत. मग हस्तांतरण करून कारखाना वाचणार असेल तर तो अडथळा कसा येतो, अशी विचारणा करत हस्तांतराबाबत काय भूमिका घेणार याबाबत वरिष्ठांशी चर्चा करा, तोपर्यंत हलणार नाही, असे पाटील यांनी सुनावले.
तोपर्यंत प्रा. एन. डी. पाटील बँकेच्या दारात आले, तुम्हाला ११ मुद्दांचे निरसन हवे ना, तसे लेखी द्या. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. बँकेमुळे कारखान्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. एवढ्या बेफिकीरीने वागू नका. दारूगोळ्यांच्या ढिगाऱ्यावर बसला आहात आणि आगीशी खेळत आहेत. त्याचे परिणाम काय होतील ते बघा, असा इशारा प्रा. पाटील यांनी दिला. दुपारनंतर बॅँक व शासन पातळीवर याबाबत चर्चा सुरू होती. संजय पाटील, सर्जेराव पवार, अरविंद पाटील, विश्वनाथ मिरजकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कारखान्यातून मशिनरी बाहेर पाठवण्यात हात असलेले तत्कालीन प्राधिकृत अधिकारी अनिल देसाई यांना राज्य बँकेने निलंबित केले. पण ज्यांचा फायदा केला त्या गणपती संघाने त्यांना सरव्यवस्थापक करून बक्षीस दिल्याचे लाड यांनी सांगितले.

केवळ कमिशनसाठी येता का?
कारखाना कार्यस्थळावर वीज, पाणी नाही, तिथे कर्मचारी कसे राहत असतील. याचा कधी विचार केला का? साखर विक्रीचे टेंडर असले की कमिशन घेण्यासाठी तुम्ही येता, असा थेट आरोप एका शेतकऱ्याने बकाल यांच्यावर केला.

पोलीस-आंदोलनकर्त्यांत हमरी-तुमरी
बँकेत जाण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत आज चांगलीच हमरी-तुमरी उडाली. खाकीवर्दीच्या जोरावर शेतकऱ्यांवर दादागिरी करू नका, असे पोलिसांना सुनावल्याने काही काळ राज्य बँकेच्या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
बंदोबस्त अन् तणाव
बँकेला कुलूप लावण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्याने बँकेच्या दारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. कामगार व शेतकऱ्यांनी तासभर बॅँकेच्या दारात बसून बॅँकेविरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते.
अधिकाऱ्यांना घेरले!
जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही आणि कर्मचाऱ्यांनाही सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. आंदोलनकर्त्यांनी थेट गृहमंत्री आर. आर. पाटील व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना सायंकाळी सात वाजता सोडले.
१ आॅगस्टला उपोषण
शेतकऱ्यांच्या घामातून उभारलेल्या कारखान्यासाठी ‘आर या पार’ची लढाई सुरू आहे. १ आॅगस्टला १ हजार शेतकरी उपोषणाला बसणार असल्याची घोषणा लाड यांनी केली.

Web Title: Government Days Filled - N. D. 'Kadadale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.