गोरगरिबांना शिक्षण देणे शासनाचे कर्तव्य : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:22 AM2018-02-27T00:22:08+5:302018-02-27T00:22:08+5:30

Government duty to educate the poor: N. D. Patil | गोरगरिबांना शिक्षण देणे शासनाचे कर्तव्य : एन. डी. पाटील

गोरगरिबांना शिक्षण देणे शासनाचे कर्तव्य : एन. डी. पाटील

Next
ठळक मुद्देशैक्षणिक धोरणाविरुद्ध २३ मार्चच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनजनजागृतीसाठी सर्वच शाळांत तालुका, गावपातळीवर प्रत्येक शाळात पालकांच्या सभा

कोल्हापूर : गोरगरिबांना शिक्षण देणे हा शासनाचा अधिकार आणि कर्तव्यच आहे, या कर्तव्यापासून शासनाला किंचितही मागे हटू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. सध्याचे शैक्षणिक धोरण हे घटनाबाह्य असल्याने या शासनाच्या धोरणाविरुद्ध २३ मार्चला कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा’ या मागणीसाठी जिल्हाभर ‘शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू आहे. सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत कृती समितीची बैठक झाली. शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरुद्ध रणशिंग फुंकण्याचे आवाहन प्रा. पाटील यांनी केले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन डी. बी. पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड, एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील तसेच शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार, आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रा. डॉ. पाटील म्हणाले, शाळांचे कंपनीकरण करू नये, सर्व शाळा शासन मान्यतेनेच अनुदानानेच चालू ठेवाव्यात. राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या मोफत शिक्षणाच्या अधिकाराला शासन काळिमा फासत आहे, शासनाच्या या धोरणामुळे सर्वसामान्याला शिक्षण महाग होऊन त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. हे होऊ न देण्यासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

यासाठी दि. २३ मार्चला सकाळी ११ वाजता गांधी मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार बैठकीत केला. मोर्चात विद्यार्थी, पालक, नागरिक, शिक्षकांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

जनजागृतीसाठी सर्वच शाळांत तालुका, गावपातळीवर प्रत्येक शाळात पालकांच्या सभा, बैठका घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्टÑपती, मुख्य न्यायाधीश, शिक्षणमंत्र्यांना फोनवर अगर पत्राद्वारे ‘शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा’ असा मेसेज पाठविणार आहे. यावेळी वसंतराव मुळीक, रमेश मोरे, भरत रसाळे, महादेव पाटील, प्रभाकर आरडे, संभाजी जगदाळे, नामदेवराव गावडे, राजेंद्र वरक, प्रा. टी. एस. पाटील, लाला गायकवाड, राजाराम सुतार, गिरीश फोंडे, आदी उपस्थित होते.

महिलांचा महिलादिनी ‘लाँग मार्च’
दि. २३ मार्चच्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी व महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. ६) सकाळी ११.३० वाजता बिंदू चौकातून दसरा चौकापर्यंत महिलांचा ‘लाँग मार्च’ काढण्याचाही निर्णय झाला. दि. १३ मार्चला सकाळी ११ वाजता कोल्हापुरातील सर्वच शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी आपापल्या शाळेच्या दारात रस्त्यावर उभे राहून प्रार्थना, राष्टÑगीत, प्रतिज्ञा म्हणून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शताब्दी’ऐवजी श्राद्ध
राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. त्याला सन २०१७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली असताना या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्याऐवजी या कायद्याचे श्राद्ध घालण्याचे काम शासन करीत असल्याची टीका यावेळी केली.

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने सोमवारी कोल्हापुरात ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रा. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नामदेव गावडे, रमेश मोरे, दादा लाड, डी. बी. पाटील, एस. डी. लाड, अशोक पोवार, भरत रसाळे, व्यंकाप्पा भोसले, श्रीकांत भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Government duty to educate the poor: N. D. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.