शासकीय कर्मचाऱ्यांचा पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:58 AM2019-08-25T04:58:51+5:302019-08-25T04:59:21+5:30
करवीर तहसीलमधील प्रकार । मागच्या दाराने पळविली पोती
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अभूतपूर्व पुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून माणूसकीच्या भावनेतून कनवाळू दानशूरांनी पूरग्रस्तांसाठी पाठवलेल्या चीजवस्तू चक्क सरकारी यंत्रणेनेच हडप केल्याचा प्रकार करवीर तहसील कार्यालयात घडला असून त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. करवीर तहसील कार्यालयात आलेली पूरग्रस्तांसाठीच्या मदतीची पोती येथीलच काही कर्मचाऱ्यांनी मागच्या दारातून पळवून नेल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
महापुराचा विळखा बसल्याने शेतीसह, घरे, प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी देशभरातून अनेक सामाजिक संस्थांकडून, शासनाकडून मदत देण्यात आली. शहरातील युवा शक्तीच्यावतीने करवीर तहसील कार्यालयात पूरग्रस्तांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. चांगल्या दर्जाचे साहित्य असल्याने तहसील कार्यालयातील काही कर्मचाºयांनी मदतीची पोती स्वतंत्र ठेवली होती.
या कार्यालयात एक पूरग्रस्त कर्मचारी आहे. त्याला संसारोपयोगी वस्तूंसाठी कार्यालयाच्या वतीने दहा हजार रुपये दिले आहेत. तसेच सामाजिक संस्थांकडून मदतही दिली आहे. त्याच्या नावावर काही कर्मचाºयांनी पूरग्रस्तांसाठी आलेली मदत कार्यालयाच्या पाठीमागील दरवाजाने आपल्या घरी नेली. गेले दोन दिवस कार्यालयात शासकीय मदतीसाठी कोट्यवधींची रोकड येत असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या पोलीस यंत्रणेला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तत्काळ तहसीलदार सचिन गिरी यांना सांगितले; परंतु गिरी यांनी आमच्याच कार्यालयात पूरग्रस्त कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ही मदत आणल्याचे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
लाजिरवाणा प्रकार
पूरग्रस्तांना आलेल्या मदतीवर शासकीय कर्मचारी डल्ला मारीत असल्याने जिल्हा प्रशासनासाठी हा लाजिरवाणा प्रकार आहे. एका तहसील कार्यालयातील हा प्रकार उजेडात आला. इतरही अनेक शासकीय कार्यालयांतून पूरग्रस्तांच्या मदतीची लूटमार होणार नाही यासाठी जिल्हाधिकाºयांनी वेळीच लगाम घालण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.