शासकीय ग्रंथमहोत्सव उद्यापासून
By admin | Published: February 18, 2015 11:38 PM2015-02-18T23:38:07+5:302015-02-18T23:43:05+5:30
शाहू स्मारक येथे आयोजन : कार्यशाळा, कविसंमेलन, परिसंवाद
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यावतीने २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, शाहू स्मारक भवन येथे सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) इंद्रजित देशमुख, माहिती उपसंचालक वर्षा शेडगे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्यासाठीचे संस्कार शालेय जीवनापासूनच केले जाणे आवश्यक आहे. त्यासाठीचा महत्त्वाचा उपक्रम म्हणून ग्रंथमहोत्सवाकडे पाहणे आवश्यक आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी व वाचनाबद्दलची आवड निर्माण व्हावी यासाठी कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवस्थळी ग्रंथांचे स्टॉल मांडण्यात येणार असून, त्यात शासकीय मुद्रणालयासह अन्य प्रकाशन संस्थाही सहभाग घेणार आहेत. तरी अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महोत्सवातील कार्यक्रम
शुक्रवार (दि. २०)
सकाळी साडेआठ : ग्रंथदिंडी, साडेदहा : ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन,
दुपारी ३ वाजता : ‘अभ्यास कौशल्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर कार्यशाळा
सायंकाळी साडेपाच : विविध शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम
शनिवार (दि. २१)
सकाळी १० : बालकविसंमेलन, ११ वाजता : कथाकथन, दुपारी १ वा. : शालेय जीवन आणि प्रसारमाध्यमांची भूमिका, ४ वा. : ‘आजची वाचनसंस्कृती’ यावर परिसंवाद
रविवार (दि. २२)
दुपारी ४ वाजता : कविसंमेलन
सायंकाळी साडेपाच : समारोप.