फुटबॉलपटू अनिकेत जाधव याच्या बक्षीसाचा शासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:44 AM2019-09-17T10:44:01+5:302019-09-17T10:45:42+5:30
कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याचा आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभाग होता. या स्पर्धेत खेळलेला अनिकेत हा कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, वर्ष उलटले, तरी हे बक्षीस शासनाने दिलेले नाही.
कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याचा आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभाग होता. या स्पर्धेत खेळलेला अनिकेत हा कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, वर्ष उलटले, तरी हे बक्षीस शासनाने दिलेले नाही.
या स्पर्धेतील सहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या फुटबॉल संघाबरोबर अनिकेतला ‘विशेष निमंत्रित’ करून गौरव केला होता. अनिकेतच्या खेळाची दखल घेऊन जमशेदपूर एफसी संघ फुटबॉल संघाने दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
स्पेन येथील व्हेलिनिकामध्ये सीओटीआयएफ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात फॉरवर्ड म्हणून निवड झाली होती. त्यासह इंग्लंड येथील ‘ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल क्लब’ या इंग्लिश प्रीमियर लीगमधील व्यावसायिक क्लबकडे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्याने जिद्द, कष्ट, कौशल्य आणि चमकदार कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल क्षेत्रात देश, महाराष्ट्र आणि कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिकेतची फुटबॉल क्षेत्रातील भरारी, कामगिरी आदर्शवत ठरणारी आहे. त्याने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा रोवला आहे. वर्षभरापूर्वी जाहीर झालेली बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी अशा गुणवंत खेळाडूला प्रतीक्षा करावी लागणे. त्याच्या नातेवाईकांना मंत्रालयात हेलपाटे मारायला लागणे अयोग्य आहे.
अनिकेत याला जानेवारी २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले. हे बक्षीस मिळविण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. मंत्रालयात वारंवार हेलपाटे मारले आहेत. खासदार संभाजीराजे, आमदार बच्चू कडू यांनीदेखील पाठपुरावा केला आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप बक्षिसाची रक्कम अनिकेत याला मिळालेली नाही.
- संजय जाधव,
अनिकेतचे मामा