‘पणन’ची शेतमाल तारण कर्ज योजना, शेतीमालाचे दर पडल्याने सरकारचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:48 PM2017-12-01T16:48:29+5:302017-12-01T16:56:24+5:30
शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.
कोल्हापूर : शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.
ज्या-त्या हंगामात शेतीमालाची आवक बाजारात वाढते, परिणामी दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. पैशांची गरज असल्याने शेतीमाल घरात ठेवणेही अवघड असते. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांना माल विकावा लागतो. यासाठी राज्य सरकारने शेतमाल तारण कर्ज योजना आणली आहे.
या योजनेत तूर, सोयाबीन, मूग, उडिद, चणा, भात, ज्वारी, बाजरी, मका, गहू, करडई, सूर्यफूल, हळद, बेदाणा व काजू बी या शेतीमालाचा समावेश आहे. तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समिती किंवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समिती अथवा कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले आहे.