आरोग्य विभागात शासकीय नोकरीचे आमिष, सहाजण ताब्यात, दहा लाख हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 07:32 PM2018-08-16T19:32:51+5:302018-08-16T19:41:07+5:30

आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावतो असे सांगुन चाळीस तरूणांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा गंडा लावणाऱ्या सहा जणांच्या तोतया टोळीला बुधवारी दुपारी चारच्या तावडे हॉटेल येथे पोलीसांनी सापळा रचून शिताफीने पकडले.

Government job lure in health department, six arrested, ten lakh custody | आरोग्य विभागात शासकीय नोकरीचे आमिष, सहाजण ताब्यात, दहा लाख हस्तगत

आरोग्य विभागात शासकीय नोकरीचे आमिष, सहाजण ताब्यात, दहा लाख हस्तगत

ठळक मुद्देआरोग्य विभागात शासकीय नोकरीचे आमिष, सहाजण ताब्यातदहा लाख हस्तगत, सांगलीतील दोघांचा समावेश, घरावर छापे

शिरोली : आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावतो असे सांगुन चाळीस तरूणांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा गंडा लावणाऱ्या सहा जणांच्या तोतया टोळीला बुधवारी दुपारी चारच्या तावडे हॉटेल येथे पोलीसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. गेल्या सहा महिन्यात या टोळीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घातला आहे, याबाबत उपाध्यक्ष सुरज गुरव यांनी शिरोली पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.


रोख दहा लाख रुपये आणि एक चारचाकी स्विफ्ट डिझायर गाडी, मोबाईल त्यांच्याकडुन हस्तगत केले आहेत. या मध्ये विजय विलास चव्हाण (रा. बहिरेवाडी, वारणानगर, ता. पन्हाळा), हेमंत हणमंत पाटील रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली),अधिक पाटील, बजरंग सुतार (दोघे रा. ऐतवडे खुर्द),भास्कर वडगावे (रा. चिचवाड) दिलीप कांबळे (रा. गारगोटी) या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तर सचिन हंबीरराव पाटील (रा.वाटेगाव, ता. वाळवा, जि.सांगली) हा फरारी आहे. ही कारवाई करवीर उपाधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सुशांत चव्हाण यांच्या पथकाने केली.


अधिक माहिती अशी, आरोपी हेमंत पाटील आणि सचिन पाटील यांनी (संभापूर, ता. हातकणंगले) येथील संभाजी निकम यांना विश्वासात घेऊन लोणावळा येथे गोयल हा शासकीय  अधिकारी असल्याचे भासवून आरोग्य विभागात विविध पदे भरावयाची आहेत, यासाठी प्रत्येकी चार लाखांची मागणी केली. सुरूवातीला दोन लाख रुपये आणि आॅर्डर मिळाल्यावर दोन लाख रुपये असे ठरविण्यात आले.

या आमिषाला बळी पडून संभाजी निकम याने मित्र सुशांत पाटील (मौजे तासगांव), सागर पाटील (रा.वाठार), तुषार पिष्टे (रा.केर्ले), सुशांत दबडे, विशाल दबडे, संदीप दबडे (तिघे रा. सावरवाडी),अमन जमादार (मिणचे) यांना शासकीय नोकरीला लावतो असे सांगुन सुमारे १४ लाख रुपये मे ते १५ आॅगस्ट २०१८ कालावधीत गोळा करून हेमंत पाटील याच्याकडे दिले. सुमारे चाळीस लोकांना नोकरीची बनावट आॅर्डर या टोळीने दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हेमंत पाटील यांने फेब्रुवारी २०१८ मध्ये ही शक्कल लढवली. मावसभाऊ सचिन हंबीरराव पाटील, विजय विलास चव्हाण, अधिक पाटील, बजरंग सुतार, भास्कर वडगावे, दिलीप कांबळे  यांच्यासोबत गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे, जळगाव या ठिकाणी फिरून तेथील सुशिक्षित बेकार तरूणांना आरोग्य विभागात शासकीय नोकरीला लावतो असे सांगुन या टोळीने प्रत्येकी चार लाख रुपये घेऊन अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस जणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असले तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे गुरव यांनी सांगितले.

९ आॅगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये मराठा समाजाच्या मोर्चावेळी शिरोली एमआयडीसी मधील एका मोठ्या कंपनीत कामाला असलेल्या कामगाराने उपाधिक्षक सुरज गुरव यांची भेट घेऊन त्यांना या फसवणुकीबाबत माहिती दिली. यावरून पोलीसांनी  तत्काळ चक्रे फिरवली. या कारस्थानाची संपूर्ण माहिती असलेल्या टोप संभापूर येथील संभाजी निकम याला दोन दिवसापूर्वी पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सातजणांनी आरोग्य विभागात नोकरी लावतो असे खोटे सांगुन पैसे लुटत असल्याचे सांगितले.

बुधवारी हे सहाजण तावडे हॉटेल येथे येऊन एका व्यक्तीबरोबर व्यवहार करणार असल्याचे निकम याने माहिती दिल्यावर दिवसभर तावडे हॉटेल परिसरात पोलीसांनी सापळा रचला. यावेळी हे सहाजण स्विफ्ट डिझायर कारमधून आले. संबंधित व्यक्ती बरोबर व्यवहार सुरू असताना पोलीसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन गाडीसह रोख दहा लाख रुपये आणि मोबाईल जप्त केले आहेत. 

उपाधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सुशांत चव्हाण, सुनिल माळी,बाबासो मुल्ला,राकेश माने, मोहन गवळी,नारायण गावडे यांचा पोलिस पथकात समावेश होता.

शासकीय अधिकारीही सहभागी

ऐतवडे खुर्द येथील बजरंग सुतार हा सहाय्यक संचालक कार्यालय कोल्हापूर येथील आरोग्य विभागात सध्या सेवेत आहे. तो या तरूणांना मी स्वत: शासकीय अधिकारी आहे आणि तुमची फसवणूक होणार नाही, तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्ही पैसे द्या असे सांगायचा. 

म्होरक्या हेमंत पाटील

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येडेमच्छिंद्र येथील हेमंत हंबीरराव पाटील याची ही शक्कल लढवली. सोबतीला मावसभाऊ सचिन हंबीरराव पाटील होता. विजय चव्हाण , बजरंग सुतार,अधिक पाटील हे तिघेजण एजंट होते. तिघेजण कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून तरूणांना आमिष दाखवून आणत होते.

 रुबाब शासकीय अधिकाऱ्यांसारखा

हेमंत पाटील हा लोणावळ्याला शासकीय अधिकारी आहोत असे भासवून लाल दिवा असलेल्या अलिशान गाडी, सोबत दोन बहुरूपी पोलीस गार्ड असा रुबाबात भेटायला येत. पोलिसांना ही अलिशान आॅडी गाडी अद्याप सापडलेली नाही. हेमंत पाटील याच्यावर फलटण आणि खेड या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.


कोणतीही शासकीय नोकरी वशिल्याने पैसे भरून होत नाही, असे भामटे तरूणांची फसवणूक करतात. आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि नोकरीसाठी कोणाला पैसे देऊ नये
सुरज गुरव,
पोलिस उपाधिक्षक

Web Title: Government job lure in health department, six arrested, ten lakh custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.