कंत्राटीकरण, खासगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची कोल्हापुरात केली होळी
By विश्वास पाटील | Published: October 2, 2023 05:44 PM2023-10-02T17:44:46+5:302023-10-02T17:46:06+5:30
कोल्हापूर : कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची जाहीर होळी सोमवारी सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यातर्फे माजी न्यायमूर्ती ...
कोल्हापूर : कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या शासकीय अध्यादेशाची जाहीर होळी सोमवारी सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यातर्फे माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांच्या हस्ते उभा मारुती चौक येथे केली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत आसगावकर आणि आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या.
सकल मराठा समाज शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यातर्फे सकाळपासून उभा मारुती चौक येथे उपोषण आणि धरणे आंदोलन झाले. सुरुवातीला आदित्य राज आणि विरा चव्हाण या दोन लहान मुलांच्या हस्ते आणि आनंदराव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विकास जाधव आणि संजय साळोखे यानी दिवसभर लाक्षणिक उपोषण केले. प्रास्ताविकात .ॲड अजित चव्हाण, यांनी मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यायचे असेल तर ते लोकसभेमध्ये 50 टक्क्यावरील आरक्षणाचा ठराव करूनच द्यावे लागेल हे स्पष्ट केले. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून शासनाने मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसली असल्याचे सांगितले. कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी कंत्राटीकरण म्हणजे भ्रष्टाचाराचे कायदेशीर कुरण असून तरुणांना अत्यल्प पगारावर राबवले जाणार असल्याचे सांगितले.
आमदार आसगावकर यांनी शाळांचे खासगीकरण केल्यास सर्वसामान्यांचे शिक्षण बंद होणार असल्याचे मत व्यक्त केले. आमदार जयश्री जाधव यांनी मराठा समाजाच्या व कंत्राटीकरण विरोधी आंदोलनाला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. अनिल चव्हाण, अमर जाधव, सुनंदा चव्हाण, शोभा पाटील, रवी चव्हाण, आनंदराव चौगुले, रवी जाधव, पंडित कंगले, प्रा डॉ टी एस पाटील यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाला विविध संघटना आणि तरुण मंडळानी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. अनिल चव्हाण यांनी आभार मानले. विकास जाधव यांनी सूत्रसंचालन केले.