इचलकरंजीच्या काळम्मावाडी योजनेबाबत शासन सकारात्मक
By Admin | Published: March 27, 2015 10:41 PM2015-03-27T22:41:22+5:302015-03-27T23:57:42+5:30
नगरविकास राज्यमंत्री : आयजीएमबाबत नगरपालिकेला सूचना
इचलकरंजी : काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे इचलकरंजी शहरास पाणी पुरविणाऱ्या योजनेविषयी शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तसेच आयजीएम रुग्णालय ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’ तत्त्वाने चालविण्यास द्यावा, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नगरपालिकेच्या शिष्टमंडळास केली.
इचलकरंजी नगरपालिकेकडील विविध विकासकामे, नागरी सेवा-सुविधा व शासकीय योजना याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी राज्यमंत्री पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, आरोग्य सभापती सुजाता बोंगाळे, अजित जाधव, मदन झोरे, प्रमोद पाटील, महेश ठोके, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, नगररचनाकार डी. एस. चव्हाण, नगरसेविका, आदी उपस्थित होते. प्रारंभी आमदार हाळवणकर, नगराध्यक्ष बिरंजे, मुख्याधिकारी पवार, आदींनी नगरपालिकेच्या विविध कामांविषयी माहिती दिली.
त्यानंतर राज्यमंत्री पाटील म्हणाले, इचलकरंजीस काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्यासाठी जीवन प्राधिकरणाने ५२५ कोटी रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे. नगरपालिकेचे रुग्णालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्त्वाने चालविण्यास द्यावा. त्यामध्ये रुग्णालयाकडे होणाऱ्या नफ्याची विभागणी नगरपालिका व संबंधित संस्था यांच्यात होईल. मात्र, दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय कुटुंबासाठी होणाऱ्या औषधोपचाराचा निधी शासन देईल. तसेच सरकारच्यावतीने चालू असलेल्या राजीव गांधी जीवनदायिनी, कुटुंब नियोजन, क्षयरोग निर्मूलन, एड्स, मलेरिया, आदींबाबतच्या असलेल्या योजनांचा सुद्धा निधी शासन देईल. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकाम शास्ती कायदा रद्द करण्याविषयी शासन धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार करीत आहे. हा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. तसेच रस्ते अनुदान, अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती याचाही योग्य तो विचार शासन करेल.
- रणजित पाटील,
नगरविकास राज्यमंत्री