सुळकूड-दूधगंगा योजनेवर शासनाकडून शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:34+5:302021-01-02T04:20:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरासाठीच्या सुळकूड (ता. कागल) येथील दूधगंगा पाणी योजनेवर शासनाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा डीपीआर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरासाठीच्या सुळकूड (ता. कागल) येथील दूधगंगा पाणी योजनेवर शासनाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) लवकरच तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ही योजना सर्वांच्या सहकार्याने मार्गी लागेल. त्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी केले आहे.
शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातून वारणा योजना आणली होती. त्याचा उपसा दानोळी (ता. शिरोळ) ही योजना दानोळीकरांच्या विरोधामुळे बारगळली. त्यानंतर चोपडे यांच्या प्रयत्नातून दूधगंगा नदीवरील पाणी योजनेचा प्रस्ताव पुढे आला. या योजनेला १८ जून २०२०च्या मंत्रालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. दरम्यान, या योजनेलाही नदीकाठची गावे व लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यानंतर कोरोना संसर्ग सुरू झाल्याने या योजनेचे काम रखडले होते. डीपीआर व पीएफआरमध्ये काही त्रुटी राहिल्याने जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देत त्या सुधारल्या. पीएफआर (व्यवहार्यता अहवाल) शासनाला पाठविण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली असून, अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पाठविण्यात येणार आहे.
या योजनेसाठी सुमारे ९८ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामध्ये राज्य शासनाचा ७५ टक्के तर नगरपालिकेचा २५ टक्के हिस्सा असणार आहे.