शासनाने सुतावर सॅनवॅट लागू करावा
By Admin | Published: May 17, 2016 12:27 AM2016-05-17T00:27:13+5:302016-05-17T01:20:55+5:30
यंत्रमागधारक जागृती संघटनेची बैठक : सट्टेबाजारीला आळा घालणे आवश्यक
इचलकरंजी : यंत्रमाग व्यवसायातील अस्थिरता व सध्याची मंदी याबाबत यंत्रमागधारकांची मते आजमावण्यासाठी येथील यंत्रमागधारक जागृती संघटनेकडून शहरातील विविध भागात बैठका घेणे सुरू आहे. यामध्ये सुतावर सॅनवॅट लागू करावा, म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करून केला जाणारा सट्टेबाजार थांबेल, अशी मते यंत्रमागधारकांनी व्यक्त केली.कलानगर, सुर्वे मळा, बंडगर माळ या परिसरातील यंत्रमागधारकांची बैठक झाली. बैठकीत यंत्रमागधारकांनी विविध मते मांडली. यामध्ये आठवड्यातून एक दिवस २४ तास कारखाना बंद ठेवावा. यंत्रमाग महामंडळाकडून कापड विणणे व खरेदी केली जावी. सूत व्यापाऱ्यांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या कृत्रिम टंचाईवर विक्रीकर विभागाने नजर ठेवावी. सूत खरेदी व कापड विक्री यंत्रमागधारकांनी ग्रुपने करावी, असे अनेक मुद्दे मांडले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनय महाजन होते. यावेळी अशोक बुगड, मोहन ढवळे, प्रवीण कदम, दीपक बांबरे, दीपक सुर्वे, अमित होगाडे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)