सरकारने गोळ्या, लाठ्यांनी संप मोडू नये
By Admin | Published: June 4, 2017 01:37 AM2017-06-04T01:37:46+5:302017-06-04T01:37:46+5:30
एन. डी. पाटील यांचा इशारा : संप मागे घेण्याचा निर्णय वेदनादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ७० वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी कुणाचेही नेतृत्व न मानता संघटित झाल्याने भवितव्य आश्वासक वाटत होते. कोणताही प्रश्न सुटलेला नसताना शेतकरी नेत्यांनी संप मागे घेऊन आत्मघातकीपणा केला. हा निर्णय वेदनादायी आहे. सरकारने सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून गोळ्या व लाठ्यांनी संप मोडू नये, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केला.
शेतकरी संप मागे घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. पाटील पत्रकारांशी बोलत होते. कधी नव्हे ते शेतकरी एकजुटीने रस्त्यावर उतरला होता. संपाचे मनोधैर्य टिकविण्यासाठी एकजूट कायम राहणे गरजेचे होते. संप शांततेच्या मार्गाने करावा, याचा आग्रह आमचा कायम राहणार; पण सरकारला संवेदनशीलताच नसेल, तर शेतकऱ्यांनी काय करावे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून संप चिरडण्याचा प्रयत्न ही वृत्ती योग्य नसून, सरकारने माधव भंडारी यांच्यासारख्या वाचाळवीरांना मुसक्या घालाव्यात, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला. संपाबाबत सरकारशी चर्चा करायला जाणार आहात का? याबाबत प्रा. पाटील म्हणाले, न बोलावता चर्चेला का जाऊ. मी काय आण्णा हजारे आहे का? आण्णांना पुन्हा एकदा या बाजारपेठेत यायचे असेल, म्हणून कदाचित ते मध्यस्थी करायला इच्छुक असतील. सरकार नेमके कोणाच्या सल्ल्याने चालते हेच कळत नाही.
तेव्हा कोणत्या बिळात होता?
संवेदनहीन सरकारला जाग आणण्यासाठी रस्त्यावर दूध ओतले म्हणून हळहळ व्यक्त केली जाते; दोन वर्षे लाखो क्विंटल कांदा कुजून गेला, तेव्हा हे लोक कोणत्या बिळात लपून बसले होते? असा सवाल त्यांनी केला.
तूर खरेदीबाबत मेहरबानी केली का?
तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याचे मंत्री सांगतात. शेतीमाल खरेदीची मुदत कसली घालता, मुदतवाढ करून मेहरबानी केली का? सरकारकडे आश्वासने पाळायची शक्ती नसल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.