कॉलेजमध्ये राजकीय वादळ घुमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:01 AM2019-07-22T01:01:19+5:302019-07-22T01:01:27+5:30
कोल्हापूर : महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या पद्धतीने होणार आहेत; मात्र त्यातील वयाची २५ ...
कोल्हापूर : महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका तब्बल २५ वर्षांनंतर खुल्या पद्धतीने होणार आहेत; मात्र त्यातील वयाची २५ वर्षांची मर्यादा वाढायला हवी, आचारसंहिता शिथिल करावी, वयोमर्यादा बरोबर योग्य आहे, या आचारसंहितेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नेतृत्व करता येईल, अशा संमिश्र प्रतिक्रिया कोल्हापुरातील विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी व्यक्त केल्या.
नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. नव्या रचनेत विद्यार्थी मंडळाऐवजी महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषद अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे; मात्र या निवडणुकीसाठीची पात्रता आणि आचारसंहितेबाबत विद्यार्थी संघटनांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या संघटना आणि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
आचारसंहितेतील मुद्दे
महाविद्यालय, विद्यापीठाच्या परिसरात मेळावे घेणे, मिरवणुका काढण्यास परवानगी नाही.
राजकीय पक्ष, इतर संघटनांचा सहभाग, त्यांचे बोधचिन्ह आणि छायाचित्र वापरता येणार
नाही.
प्रवेश वैध असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानाचा अधिकार.
निवडणुकीसाठीची पात्रता, नियम
२५ वर्षे वयाच्या आतील विद्यार्थी निवडणुकीसाठी पात्र आहेत.
मान्यताप्राप्त, नियमित, पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यालाच निवडणूक लढविता येणार आहे.
एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या, एटीकेटीधारक विद्यार्थ्याला निवडणूक लढविता येणार नाही.
राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाºया उमेदवारांना जात प्रमाणपत्र बंधनकारक असेल. त्याची तपासणी निवडणूक अर्ज भरताना केली जाईल.
एका विद्यार्थी मतदाराला पाच पदांसाठी मतदान करावे लागणार आहे. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी आणि वर्गप्रतिनिधी यांचा समावेश आहे.
राजकीय ‘लेबल’ लावल्यास कारवाई होणार ?
या निवडणुकांच्या नव्या नियमानुसार उमेदवाराला पक्षीय, संघटनांचे लेबल लावता येणार नाही. तसे झाल्यास या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येणार आहे. या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे पक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार, यात शंका नाही. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी उमेदवारास राजकीय पक्षाचे लेबल लावल्यास त्यावर कारवाई होणार का? याचे उत्तर मात्र अनुत्तरीत असल्याची प्रतिक्रिया राज्य वनविकास महामंडळाचे माजी संचालक माणिक पाटील-चुयेकर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
निवडणूक कार्यक्रम ३० जुलैपर्यंत जाहीर करणार
या निवडणुकीसाठी यंत्रणा उभारणी आणि त्यासाठी येणाºया अडचणींची माहिती घेतली जात आहे. निवडणूक कार्यक्रम दि. ३० जुलैपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू असल्याची माहिती विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.