तंबाखू संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी : चंद्रकांतदादांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 05:22 PM2017-08-26T17:22:25+5:302017-08-26T17:24:53+5:30
कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : व्यक्तीप्रमाणे संस्थांच्या वाटचालीत चढउतार येत जातात; त्यातून मार्ग काढून जे पुढे जातात, तेच यशस्वी होतात. याप्रमाणे डॉ. संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ संघाला पुन्हा उभारी आणण्याचा प्रयत्न केला असून, संघाच्या गतवैभवासाठी सरकार पाठीशी राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
शेतकरी सहकारी तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘तंबाखू संघा’च्या अधोगतीची कारणे शोधून बाहेर पडण्याच्या योजना शोधा. संस्थांच्या चौकशा कधीपासून प्रलंबित आहेत, याची माहिती द्या, असे सांगत मंत्री पाटील म्हणाले, आम्ही आतापर्यंत न्यायाच्या बाजूने उभे राहिलो आहोत; ‘तंबाखू संघ’, ‘मयूर’सह इतर संस्था ताकदीने सुरू करा, सरकारकडून लागेल ती मदत दिली जाईल.
सहकाराचा पाया खासगीकरणामुळे डळमळीत झाला असून, संस्था जागरूकपणे चालविणे गरजेचे असल्याचे सांगत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, संजय पाटील यांनी ‘तंबाखू’ समूहाच्या माध्यमातून सहकार वाढविला; पण कदाचित राजकारणात आल्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. समाज बदलण्याची ताकद सहकारात असल्याने डॉ. पाटील यांनी संस्था पुन्हा सक्षम कराव्यात.
आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. सुशांत पाटील यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व ज्येष्ठ संचालकांचा सत्कार करण्यात आला. कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, आदी उपस्थित होते.
‘आप्पा’,‘एस. के.’ नावांचा करिष्मा!
जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ‘आप्पा’ (महादेवराव महाडिक) व ‘एस. के.’ (एस. के. पाटील) ही नावे प्रसिद्ध आहेत. या माणसांमुळे सामान्यांचे जीवन आनंदी होण्यास मदत झाल्याचे गौरवोद्गार मंत्री पाटील यांनी काढले.
‘शक्ती मिल’मधून कर्जमाफीएवढे पैसे
राज्यात अनेक प्रकरणे न्यायालयीन पातळीवर प्रलंबित आहेत. यासाठी मोठमोठ्या वकिलांची फौज घेऊनच आम्ही फिरत असून, मुंबईतील ‘शक्ती मिल’ सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांत स्थगिती उठवू अन्यथा संबंधितांशी समझोता करू. यातून ३८ हजार कोटी उभा राहणार आहेत. आम्हाला कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी लागणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
‘अंबाबाई’बरोबर ‘महालक्ष्मी’ला साकडे
तंबाखू संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी संजय पाटील यांना ‘अंबाबाई’नेच नव्हे तर ‘महालक्ष्मी’नेही ताकद द्यावी, असे समोर बसलेले वसंतराव मुळीक यांचा उल्लेख करीत मंत्री पाटील यांनी ‘अंबाबाई की महालक्ष्मी?’ या वादावर बोट ठेवल्याने सभागृहात एकच हशा पिकला.