सरकारच्यावतीने मोर्चाकडून निवेदन स्वीकारणार
By admin | Published: October 8, 2016 01:18 AM2016-10-08T01:18:32+5:302016-10-08T01:26:11+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका : मराठा समाजाचा आक्षेप; विरोध करणार
कोल्हापूर : येथे सकल मराठा समाजाच्यावतीने येत्या १५ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे सरकारच्यावतीने मी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून निवेदन स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे; परंतु मंत्री पाटील यांच्या या भूमिकेस सकल मराठा समाजाचा आक्षेप असून, मोर्चाच्यावतीने त्यांना निवेदन देण्यास विरोध होत आहे.
आतापर्यंत राज्यात मराठा सकल समाजातर्फे सुमारे पंचवीसहून अधिक मोर्चे काढण्यात आले. तिथे कुठेच मंत्री किंवा तत्सम यंत्रणेला निवेदन देण्यात आलेले नाही. किंबहुना कोणत्याही पक्षातील प्रस्थापित राजकीय नेत्यांबद्दल समाजाच्या मनात चीड आहे. त्यामुळे प्रातिनिधीक स्वरुपात पाच मुली जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात, असे आतापर्यंत होत आले आहे. मोर्चाच्या मागण्या काय आहेत हे सरकारलाही माहीत आहेत. मोर्चे सुरू होऊनही महिना होत आला तरी सरकारकडून अजून त्याबद्दल फारशी दखल घेतली गेलेली नाही असे असताना आताच निवेदन स्वीकारण्याचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंबंधी पालकमंत्री पाटील म्हणाले,‘आतापर्यंत कुठेच मोर्चाचे निवेदन मंत्र्यांनी स्वीकारलेले नाही याचा अर्थ कोल्हापुरात ते स्वीकारू नये असा होत नाही. तुम्ही मोर्चाच्यावतीने सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहात. मी तर थेट सरकारच तिथे निवेदन स्वीकारायला तयार आहे. त्यामुळे त्यास विरोध करण्यात मला कोणतेच लॉजिक दिसत नाही. मोर्चाच्यादिवशी मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहणार आहे. मराठा आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सुटावेत असाच सरकार म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.’