उपकाराची भावना असती तर सरकार बनले असते, चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:56 PM2024-10-03T12:56:56+5:302024-10-03T12:57:30+5:30
येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील
कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या अनेक योजना महायुतीच्या शासनाने राबविल्या. त्याचा जनतेला फायदा होत आहे. या उपकाराची भावना मनात न ठेेवणारी महाराष्ट्राची जनता नाही. त्यामुळे येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील. हीच उपकाराची भावना काहींनी २०१९ साली ठेवली असती तर त्याचवेळी महाराष्ट्रात युतीची सत्ता आली असती आणि आता त्यांचं झालेले नुकसान झालं नसतं, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
पाटील हे त्यांच्या मूळ गावी खानापूर ता. भुदरगड येथील देखण्या शाळा इमारतीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र भुयार आणि अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत विचारणा केल्यावर ते म्हणाले, भुयार नेमके काय म्हणाले ते मला आता माहिती नाही. परंतु, महिलांचा अपमान होणारे ते काही बोलले असतील तर त्यांना मी माफी मागायला लावेन. अमित शाह हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळेच ते २०२९ बद्दल बोलले असतील. परमेश्वर, महापुरूष आणि वरिष्ठ नेते यांच्यावर बोलण्याचे धाडस आणि त्यांचा उपमर्द हे संजय राऊतच करू शकतात, असेही ते म्हणाले,
इथले आमदार आबिटकरच असतील
अडचणीच्या काळात जे मदत करतात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच एकटे सोडत नाहीत. कितीही काहीही झाले तरी विद्यमान आमदारांना उमेदवारी हे सूत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे इथले आमदार प्रकाश आबिटकरच असतील, असा निर्वाळा यावेळी पाटील यांनी दिला.