वर्गणी भरूनही शासनाचे ‘शेतकरी’ मासिक मिळेना

By Admin | Published: December 30, 2014 09:18 PM2014-12-30T21:18:23+5:302014-12-30T23:39:59+5:30

कृषी विभागाकडून प्रकाशित : कोल्हापूर जिल्ह्यातून साडेसात लाख जमा

The government's monthly 'Farmer' gets filled through the subscription | वर्गणी भरूनही शासनाचे ‘शेतकरी’ मासिक मिळेना

वर्गणी भरूनही शासनाचे ‘शेतकरी’ मासिक मिळेना

googlenewsNext

आयुब मुल्ला -खोची -शेतकऱ्यांना शेतीबद्दल अधिक चांगली माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रकाशित होणारे ‘शेतकरी’ मासिक गेल्या पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना वर्गणी भरूनसुद्धा मिळालेले नाही. चालढकलीच्या नावाखाली मासिक लवकरच मिळेल, अशी उत्तरे शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिळत आहेत. यातील बहुतेक वाचक हे लाभार्थी असल्याने धाडसाने बोलू शकत नाही; पण जबाबदारीचे भान ठेवून संबंधित विभागाने शेतकऱ्यांना वेळेत मासिक उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
कृषी आयुक्त कार्यालयाने शेतकरी मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी जिल्ह्याला ५ हजार ४० इतके उद्दिष्ट २०१४ साठी दिले होते. त्यानुसार वार्षिक वर्गणी १५० रुपयांप्रमाणे ७ लाख ५६ हजार रुपये जिल्ह्यातून जमाही झाल्याचे समजते. त्याला आता पाच महिने झाले; परंतु यातील बहुतांश शेतकऱ्यांना हे मासिक मिळालेलेच नाही. ग्रामपंचायती, सेवा संस्था, खासगी फळरोपवाटिका, कृषी सेवा केंद्रे, यांत्रिकीकरण योजनेचे व विशेष घटक योजनेचे लाभार्थी, शेतकऱ्यांकडून शेतकरी मासिकासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी कृषी अधिकारी व गुणनियंत्रण निरीक्षक यांची प्राधान्याने मदत घ्यावी, अशा सूचनाच आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीचा टप्पा गाठला जातो.
अंक घरपोच करण्याची व्यवस्था पुण्यातून होते. त्यामुळे अंक नाही मिळाला तर विचारायचे कोणाला? हा प्रश्न आहे. तालुका पातळीवर पैसे भरले तेही याविषयी अनभिज्ञ आहेत. मासिक का मिळाले नाही, म्हणून तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. त्यामुळे फोनवरून चौकशी केली असता, ‘मिळेल’ एवढेच उत्तर शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे कृषी व कृषिसंलग्न आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पादन वाढ व शेती फायदेशीर ठरावी, हा हेतू समोर ठेवून वाटचाल करणारे हे मासिकच शेतकऱ्यांना मिळत नसेल तर त्याचा विकास कसा होणार, हे कोडे आहे.


शेतकरी मासिकाच्या एकूण सुमारे एक लाख ३० हजार प्रती वर्षाला प्रकाशित केल्या जातात. जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या नाव व पत्राप्रमाणे त्या पाठविल्या आहेत. ज्यांना मिळाल्या नसतील त्यांनी संपर्क साधावा. त्यांच्या पत्त्यावर पाठविल्या जातील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या पोहोच केल्या जातात; मात्र डिसेंबरमधील कालावधी लांबला आहे. अद्याप त्या सर्वांना देऊ शकलेलो नाही.
- एस. एन. ढोबळे
(कृषी अधिकारी, शेतकरी संपादक, पुणे)



शेतकऱ्यांना मासिक मिळण्यात अडचण होत आहे. ही तक्रार गैर नाही. बहुतांश शेतकरी वंचित आहेत. यापाठीमागे वरिष्ठ कार्यालय पोस्टविभागाचेही कारण सांगते; परंतु यासंदर्भात नेमके नियोजन होणे विश्वासार्हतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
- बसवराज मास्तोळी, प्रकल्प संचालक, आत्मा संस्था, कोल्हापूर.


गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी मासिकासाठी वर्गणी भरत होतो; पण ते प्रत्येक महिन्याला मिळतच होते, अशी स्थिती नव्हती. तेव्हा तोटा करण्यापेक्षा वर्गणीच भरणे बंद केले. महिन्याला मिळेलच अशी खात्री देणार असतील, तर पुन्हा ते घेण्याची इच्छा आहे.
- मोहन प्रकाश पाटील, शेतकरी, लाटवडे, ता. हातकणंगले.

Web Title: The government's monthly 'Farmer' gets filled through the subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.